शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामुळे सध्या ‘YRF स्पाय युनिव्हर्स’ची जोरदार चर्चा चालू आहे. ‘पठाण’, ‘टायगर ३’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉक बस्टर ठरले. त्यामुळे आता ‘स्पाय युनिव्हर्स’मध्ये नवीन काय पाहायला मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अखेर याबद्दल नुकतीच एक नवीन माहिती समोर आली आहे. ‘YRF स्पाय युनिव्हर्स’मध्ये आता बॉलीवूडची फेव्हरेट स्टुडंट आलिया भट्टची एन्ट्री झाली आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे.

आलिया भट्टने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘अल्फा’ या तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून याचं दिग्दर्शन ‘द रेल्वे मॅन’ फेम शिव रवैल करणार आहेत. मुंबईत शूटिंग झाल्यावर या चित्रपटाचं काही शूटिंग परदेशात देखील करण्यात येणार आहे. आलिया भट्ट या चित्रपटात एका वेगळ्या अंदाजात दिसेल. तसेच या चित्रपटात अ‍ॅक्शन सीन करण्यासाठी अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून मेहनत देखील घेत आहे.

हेही वाचा : मराठमोळ्या अभिनेत्रीचं आहे ‘Kalki 2898 AD’ चित्रपटाशी खास कनेक्शन! कमल हासन यांचा उल्लेख करत म्हणाली…

‘पठाण’ चित्रपटाचे अ‍ॅक्शन दिग्दर्शक केसी ओ’नील या चित्रपटात देखील अ‍ॅक्शन कोरिओग्राफीची जबाबदारी सांभाळतील. यामध्ये आलियाबरोबर एक नवा चेहरा झळकणार आहे. हा नवा चेहरा कोणत्याही अभिनेत्याचा नसून आलियाबरोबर ‘मुंज्या’ फेम शर्वरी वाघ प्रमुख भूमिका साकारणार आहे. या दोघींची भूमिका नेमकी काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अभिनेत्री शर्वरी ही महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. सध्या अभिनेत्री ‘मुंज्या’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मनोहर जोशी यांच्या कन्या नम्रता यांची शर्वरी लेक आहे. गेली अनेक वर्षे अभिनेत्री बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे. तिच्या कामाचं कौतुक देखील होतं. परंतु, ‘मुंज्या’मुळे शर्वरीला अफाट प्रसिद्धी मिळाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलिया भट्टबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने प्रचंड आनंदी असल्याचं शर्वरीने सांगितलं होतं.

हेही वाचा : “खरंतर हे मागच्या वर्षीच अपेक्षित होतं…”, विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक पाहून जितेंद्र जोशीची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आलिया भट्टने या चित्रपटाची घोषणा करताच नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यापूर्वीच्या ‘YRF स्पाय युनिव्हर्स’मधील चित्रपटांमध्ये ‘पठाण’ आणि ‘टायगर’ने एकमेकांच्या चित्रपटात कॅमिओ केले होते. त्यामुळे आलियाच्या चित्रपटात दोन सुपरस्टार कॅमिओ म्हणून एन्ट्री घेणार की नाही हे पाहणं देखील उत्सुकेचं ठरेल.