Amitabh And Jaya Bachchan Wedding Card : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन व ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा लग्नसोहळा ३ जून १९७३ रोजी पार पडला पडला होता. या दोघांकडे बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. यांच्या लग्नाला फक्त जवळचे मित्रमंडळी आणि काही निवडक कुटुंबीयांनी उपस्थिती लावली होती.
अमिताभ व जया बच्चन यांचं लग्न खूपच घाईघाईत झालं होतं. ‘जंजीर’ चित्रपट सुपरहिट झाल्यावर या दोघांनी लंडनला फिरायला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जया यांच्याशी लग्न केलं तरच लंडनला जाण्याची परवानगी दिली जाईल अशी अट ‘बिग बीं’चे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांना घातली होती. त्यामुळे वडिलांची आज्ञा प्रमाण मानून अमिताभ यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
अमिताभ व जया यांचा लग्नसोहळा ३ जून १९७३ रोजी मुंबईत पार पडला होता. या दोघांच्या लग्नाला आज ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने या जोडप्याची लग्नपत्रिका कशी होती पाहुयात…
काही महिन्यांपूर्वी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या मुलासह ‘कौन बनेगा करोडपती १६’मध्ये उपस्थित राहिला होता. यावेळी त्याने सर्वांना ‘बिग बीं’ची लग्नपत्रिका दाखवली होती. अमिताभ व जया यांच्या लग्नपत्रिकेवर लिहिलेला “जब तें रामु ब्याहि घर आए । नित नव मंगल मोद बधाए” हा संस्कृत श्लोक सर्वांचं लक्ष वेधून घेतो. याशिवाय या पत्रिकेवर लोकप्रिय आयरिश कवी, नाटककार आणि लेखक म्हणून ओळखले जाणारे विलियम बटलर येट्स (W.B. YEATS) यांचा कोट देखील लिहिण्यात आला होता. ‘बिग बीं’ची ही ५२ वर्षांपूर्वीची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
दरम्यान, अमिताभ व जया यांना अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन अशी दोन मुलं आहेत. यापैकी श्वेताची दोन्ही मुलं सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. तिचा मुलगा अगस्त्य नंदा ‘The Archies’ सिनेमात झळकला होता. सध्या त्याचं नाव शाहरुखच्या लेकीबरोबर जोडलं जात आहे. मात्र, दोघांनीही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तर, श्वेताची लेक नव्या नवेली नंदाचा ‘व्हॉट द हेल नव्या’ हा शो सर्वत्र लोकप्रिय झाला होता.

याशिवाय अभिषेक-ऐश्वर्याची मुलगी आराध्या सध्या तिचं शालेय शिक्षण पूर्ण करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ती आई ऐश्वर्या रायबरोबर कान्स सोहळ्याला गेली होती. आराध्याच्या शालेय कार्यक्रमांना अभिषेक-ऐश्वर्यासह ‘बिग बी’ सुद्धा आवर्जून उपस्थित राहतात.