Amitabh Bachchan Gets Emotional : अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १७ चं सूत्रसंचालन करत आहेत. कार्यक्रमादरम्यान ते स्पर्धकांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधत असतात. अशातच आता त्यांच्या वाढदिवसानिमित्तच्या भागात या कार्यक्रमात जावेद अख्तर व फरहान अख्तर यांनी हजेरी लावलेली दिसते.

अमिताभ बच्चन यांचा ११ ऑक्टोबर रोजी वाढदिवस असल्यानिमित्ताने ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात जावेद अख्तर व फरहान अख्तर हजेरी लावलणार आहेत. शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी हा भाग प्रदर्शित होणार आहे. ‘सोनी टीव्ही’ वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या भागाचा प्रोमो शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन झाले भावुक

समोर आलेल्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईचा तेजी बच्चन यांचा फोटो असलेला व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचं दिसतं. या व्हिडीओमध्ये अमिताभ व त्यांच्या आईचा फोटो पाहायला मिळतो. व्हिडीओतून खूप आधी अमिताभ यांच्या आईनं त्यांचं कौतुक केल्याची क्लिप आता पुन्हा दाखवण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या आई, “मी खूप भाग्यशाली आहे. मी जिथे कुठे जाते तिथे मला माझ्या मुलामुळे लोकांकडून खूप स्नेह व प्रेम मिळतं आणि एका आईसाठी यापेक्षा दुसरं कोणतंही सुख मोठं नसतं.” असं म्हणाल्याचं पाहायला मिळतं. हे ऐकून अमिताभ बच्चन भावुक झाल्याचं दिसतं.

या प्रोमोला ‘पाहा कौन बनेगा करोडपती १० ऑक्टोबर शुक्रवारी रात्री ९ वाजता’, अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे बिग बींच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी हा भाग प्रसारित होणार आहे. या भागातील अजून एक व्हिडीओ वाहिनीने शेअर केला असून, त्यामध्ये बिग बींनी जावेद अख्तर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. जावेद यांच्याबद्दल अमिताभ म्हणाले, “त्यांच्याबरोबर काम करीत असताना एक दिवस रात्री ते माझ्या खोलीत आले आणि अमिताभकाका तुम्हाला कुठली समस्या आहे का, असं विचारलं. तेव्हा मला असं वाटलं की, मी कोणीतरी नवोदित आहे आणि हे उस्ताद आहेत, जे मला सांगतायत की, अभिनय कसा करायचा.”

त्यामध्ये फरहान खान पुढे अमिताभ व जावेद यांना तुमच्या दोघांमधील असा एक कोणता गुण आहे, जो तुम्हाला चोरायला आवडेल, असा प्रश्न विचारतो. त्यावर जावेद अख्तर म्हणतात, “जेवढे गुण मी अमिताभ यांच्यामध्ये पाहिले आहेत, तेवढे मी फिल्म इंडस्ट्रीत कुठेच पाहिले नाहीयेत.” त्यानंतर फरहान त्यांना महिलांमध्ये कोण जास्त प्रसिद्ध होतं, असं विचारतो. त्यानंतर अमिताभ बच्चन जावेद यांच्याकडे हात दाखवतात. त्यासह या व्हिडीओच्या सुरुवातीला बिग बी जावेद अख्तर व फरहान अख्तर यांच्याबरोबर केक कापताना दिसतात.