Amitabh Bachchan Warn To Shankar Mahadevan : संगीत क्षेत्रातलं लोकप्रिय नाव म्हणजे शंकर महादेवन. राष्ट्रीय पुरस्कारविजेते गायक व संगीतकार शंकर महादेवन यांनी आपल्या अनेक सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. मराठी आणि हिंदीसह त्यांनी इतर भाषांतही अनेक गाणी गायली आणि संगीतबद्ध केली आहे. त्यांच्या लोकप्रिय गाण्यांची तर मोठी यादीच आहे, त्यापैकी एक सर्वांचं आवडतं गाणं म्हणजे ‘कजरा रे’.

अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्यावर चित्रित झालेलं ‘कजरा रे’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या गाण्याचे तसे अनेक किस्से आहेत. त्यापैकी एक खास किस्सा शंकर महादेवन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान, अमिताभ बच्चन यांनी शंकर महादेवन यांना मी तुझं करिअर संपवीन, असं म्हटलं होतं. शंकर महादेवन यांनी सांगितलेला हा किस्सा नेमका काय आहे, चला जाणून घेऊ…

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’च्या ऑल इंडिया महफिल या कार्यक्रमात बोलताना शंकर महादेवन म्हणाले, “मला आठवतंय, अमिताभ बच्चन सर त्यावेळी ‘रॉक अँड रोल’ या गाण्याचं शूटिंग करीत होते. आम्ही त्यांना सेटवर भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला अगदी प्रेमाने मिठी मारली आणि मला अक्षरश: उचलून घेतलं. कारण- त्यांना ते गाणं फारच आवडलं होतं. मला मिठी मारत ते म्हणाले, ‘काय गाणं बनवलंस रे!’ ते खरोखरच खूप नम्र आणि प्रेमळ आहेत.”

“…तर तुझं करिअर संपवीन”

त्यानंतर शंकर महादेवन यांनी ‘कजरा रे’ गाण्याशी संबंधित एक मजेशीर प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “मी अमिताभ बच्चन सरांसाठी ‘कजरा रे’ या गाण्याचं एक रफ व्हर्जन रेकॉर्ड केलं होतं. म्हणजे ते आल्यावर आपला आवाज डब करू शकतील. त्या गाण्यात जावेद अलीनं अभिषेकसाठी गायलं होतं आणि अमिताभजींसाठी मी तात्पुरता माझा आवाज वापरला होता.”

पुढे शंकर महादेवन म्हणाले, “नंतर एका कार्यक्रमात भेटल्यावर मी अमिताभ बच्चन यांना सांगितलं, ‘सर, तुमचं डबिंग करा, आम्हाला गाणं मिक्स करायचं आहे.’ त्यांनी विचारलं, ‘कुठलं गाणं?’ मी म्हटलं, ‘कजरा रे.’ त्यावर ते म्हणाले, ‘मी काय त्यात डब करू? गाणं तर परफेक्ट आहे!’ मग मी सांगितलं की, ‘सर, मी त्या गाण्यात तुमच्या जागी तात्पुरता गायलोय, तुम्ही आल्यावर ते गाणं पुन्हा करायचंय.’ त्यावर अमिताभ बच्चन सर हसत हसत म्हणाले, ‘नाही नाही, हे असंच राहू दे! तू हे बदलायचा प्रयत्न केलास, तर मी तुझं करिअर संपवीन’.”

‘कजरा रे’बद्दल थोडक्यात…

दरम्यान, २००५ साली आलेल्या ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील ‘कजरा रे’ हे गाणं शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलं होतं; तर गाण्याचे शब्द गुलजार यांनी लिहिले होते. अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय व अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं कव्वाली आणि पारंपरिक कजरी अशा दोन शैलीचं सुंदर मिश्रण होतं. कोरिओग्राफर वैभवी मर्चंट यांनी साकारलेल्या अप्रतिम नृत्यदिग्दर्शनामुळे हे गाणं त्या काळात सुपरहिट ठरलं आणि आजही लोकांच्या मनात त्याची जादू कायम आहे.