Amitabh Bachchan on Jaya Bachchan: अमिताभ बच्चन व जया बच्चन ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. जया बच्चन अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे, तसेच सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीने चाहत्यांबरोबर वागतात, त्यामुळे चर्चेत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध गोष्टींवर ते त्यांचे मत मांडतात. त्यावर चाहते अनेक कमेंट्हीस करतात. तसेच ब्लॉगच्या माध्यमातूनदेखील ते त्यांचे अनुभव, भावना व्यक्त करताना दिसतात.

सध्या बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’च्या १७ व्या सीझनचे सूत्रसंचालन करीत आहेत. या शोमध्येदेखील ते स्पर्धकांबरोबर गप्पा मारताना खासगी, तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना दिसतात.

“मी स्पर्धकाच्या खुर्चीवर…”

आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका भागामध्ये त्यांनी जया बच्चन यांचा किस्सा सांगितला आहे. पल्लवी निफाडकर या महिला स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना विचारले की, ते कधी स्पर्धकाच्या खुर्चीवर बसले आहेत का? त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले की, एकदा असे घडले होते. जया बच्चन यांनी एकदा या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्या होस्ट झाल्या होत्या आणि मी स्पर्धकाच्या खुर्चीवर बसलो होतो.

अमिताभ बच्चन यांनी त्या वेळचा अनुभवही सांगितला. ते म्हणाले, “त्यांनी असे प्रश्न विचारले की, मी त्यावेळी नि:शब्द झालो होतो. मी घाबरलो होतो.”

विशेष म्हणजे याआधीही जया बच्चन यांनी शोमध्ये अचानक हजेरी लावत अमिताभ बच्चन यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या सीझनमध्ये अभिषेक आणि जया बच्चन यांनी बिग बींचा ८० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी अभिषेक म्हणालेला की, मी कधीही अडचणीत असलो, तर माझे वडील माझ्यासाठी धावून येतात. ते माझी जीवनरेखा आहेत. त्याचे हे शब्द ऐकून बिग बी यांना अश्रू अनावर झाले होते.

त्यानंतर जया यांनी बिग बींना विचारलेले की, तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्वांत जास्त काय आवडते? त्यावर अमिताभ बच्चन म्हणालेले की, हा शो सार्वजनिक आहे. असा प्रश्न विचारणे अन्याय आहे. दरम्यान, ३ जून १९७३ ला जया व अमिताभ बच्चन यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना श्वेता व अभिषेक ही दोन मुले आहेत.