Amitabh Bachchan’s Video: अमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ कृतीमुळे नेटकरी नाराजज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. कधी त्यांच्या एखाद्या चित्रपटातील पात्राची चर्चा होते, कधी त्यांचा एखादा लोकप्रिय संवाद चर्चेत येतो. अनेकदा बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात त्यांच्या खासगी आयुष्यातील तसेच त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील अनेक किस्से सांगतात.

याबरोबरच अमिताभ बच्चन हे त्यांच्या ट्विट आणि ब्लॉगमधील त्यांच्या लिखाणामुळेदेखील चर्चेत असतात. ब्लॉगमध्ये ते त्यांचे अनुभव लिहितात. त्यांना एखाद्या विषयावर काय वाटते, त्यांचे मत काय आहे, याबद्दल ते वक्तव्य करताना दिसतात.

अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल

आता अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर जमलेल्या चाहत्यांना काही भेटवस्तू देत असल्याचे दिसत आहे. ‘इन्स्टंट बॉलीवूड’ हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

बिग बी एका उंच ठिकाणावर उभे राहिले आहेत. तिथून ते काही वस्तू चाहत्यांकडे फेकत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी ते काहींना हेल्मेट देत असल्याचे दिसत आहे. ‘इन्स्टंट बॉलीवूड’ने हा व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना छत्री आणि हेल्मेट देत आहे, असे लिहिले आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट केल्याचे दिसत आहे. अनेकांनी बिग बींनी चाहत्यांना छत्री नाही तर दांडिया दिल्या आहेत असे लिहिले आहे, तर अनेकांनी लिहिले की आयफोन १७ प्रो दिले असते तर बरे झाले असते.

नेटकरी काय म्हणाले?

तर अनेकांनी बिग बी ज्या पद्धतीने वस्तू फेकत आहेत ते चुकीचे असल्याचे लिहिले आहे. “सगळ्यांना ओळीत उभे करून दिले असते”, “वस्तू वाटण्याची ही योग्य पद्धत नाही”, “लोकांना वस्तू देण्याची सर्वात वाईट पद्धत आहे”, “हे अपमानजनक वाटत आहे”, “ते प्रेमाने वस्तू देत आहेत, असं वाटत नाही”, “भिकाऱ्यांना वस्तू दिल्या आहेत असं वाटत आहे”, “ते सगळ्यांचा अपमान करत आहेत, बाकी काही नाही”, “या लोकांकडे काही आत्मसन्मान आहे की नाही”, “मालक भीक देत आहे”, “काही इज्जत नाही. भीक घेण्यासाठी हे लोक तिथे गेले आहेत”, “खरंच सगळे भिकारी आहेत”, “ही लोकं भिकारी आहेत का? भीक देण्याच्या प्रतीक्षेत उभी असतात”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

काहींनी चाहत्यांना ट्रोल केले आहे, तर काहींनी अमिताभ बच्चन ज्या पद्धतीने वस्तू देत आहेत, त्याला ट्रोल केले आहे. अमिताभ बच्चन दर रविवारी त्यांच्या बंगल्याबाहेर त्यांच्या चाहत्यांना भेटतात. देशाच्या विविध भागांतून लोक त्यांची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जमतात. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर सध्या बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत.