Amruta Rao Talks About Politics In Bollywood : अमृता राव आजही ‘विवाह’ चित्रपटातील तिच्या पूनम या भूमिकेसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी अमृता अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएल बी ३’मधून झळकलेली. अमृता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा ती वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची तिची मतं व्यक्त करीत असते.
अमृताने काही दिवसांपूर्वी रणवीर अल्लाहबादियाला मुलाखत दिलेली. यावेळी तिने त्या पॉडकास्टमध्ये अनेक गोष्टींची माहिती दिली होती. त्यावेळी अभिनेत्रीला जादूटोणा, नजर यांबद्दल विचारलं गेलं होतं. अमृतानं यावेळी तिलासुद्धा असा अनुभव आल्याचं सांगितलं.
अमृता रावने संगितला ‘तो’ अनुभव
अमृतानं पॉडकास्टमध्ये तिला नजर लागली होती याबद्दलही सांगितलं आहे. अमृता म्हणाली, “मी एकदा हे अनुभवलं आहे. एकदा शूटिंगवरून मी आले होते आणि मला खूप कमजोरी जाणवत होती. माझ्या घरात तेव्हा एक मदतनीस होती. ती म्हणाली की, मी तुमची नजर काढते आणि तिनं माझी नजर काढली. त्यानंतर मला बरं वाटलं आणि नजर काढल्यानंतर मला काही झालंच नव्हतं, असं जाणवलं. त्यामुळे मला असं वाटतं नजर लागते. लोक म्हणतील की, हे लोक पॉडकास्टमध्ये असं काय बोलत आहेत; पण असं असतं”.
अमृता पुढे इंडस्ट्रीतील राजकारणाबद्दल म्हणाली, “इंडस्ट्रीत अशा गोष्टी घडतात. माझ्याबरोबरही झाल्या आहेत. मला आठवतं की, ‘इश्क विश्क’ प्रदर्शित झाल्यानंतर शाहीद कपूर आणि मला ‘फेस ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळालेला. त्यावेळी त्या पुरस्कार सोहळ्याच्या मागे बॅक स्टेजला आम्ही दोघं मोठमोठ्या सेलिब्रिटींबरोबर फोटोशूट करीत होतो. मी खूप आनंदी होते की, मी मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणार; पण जेव्हा ते मासिक आलं तेव्हा मी पाहिलं, तर मी कुठेतरी कलाकारांमध्ये खूप मागे होते आणि सेंटरला दुसरंच कोणीतरी होतं.”
दरम्यान, अमृता राव बॉलीवूडमधील एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. ‘मैं हूँ ना’, ‘विवाह’, ‘इश्क विश्क’ या चित्रपटांतून तिनं तिच्या अभिनय आणि सौंदर्याद्वारे अनेकांची मनं जिंकलेली. त्यासह तिनं इतरही काही चित्रपटांतही काम केलं आहे. आजही प्रेक्षक तिचे जुने चित्रपट पाहताना दिसतात.