Anupam Kher on Mahesh Bhatt: अभिनेते अनुपम खेर यांनी महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाचे समीक्षकांकडून मोठे कौतुक झाले. विशेष बाब म्हणजे अनुपम खेर यांनी वयाच्या २८ व्या वर्षी ६५ वर्षीय वृद्धाची भूमिका या चित्रपटात साकारली होती.
महेश भट्ट यांना या चित्रपटात संजीव कपूर यांना कास्ट करायचे होते. संजीव कपूर त्यावेळी सुपरस्टार होते. अभिनेता असण्याबरोबरच त्यांनी निर्माता म्हणूनदेखील स्वत:ची ओळख निर्माण केली होती.
“मी २८ वर्षांचा होतो आणि…”
अनुपम खेर यांनी नुकतीच ‘स्क्रीन’शी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ‘सारांश’ चित्रपटाची आठवण सांगितली. ते म्हणाले, “शूटिंग सुरू होण्याच्या १० दिवस आधी मला चित्रपटातून बाहेर काढले. मी २८ वर्षांचा होतो आणि ६५ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार होतो. त्यासाठी मी सगळी तयारी केली होती.
वृद्ध लोक कसे चालतात, कसे बोलतात याचे मी निरीक्षण करीत होतो. काठी घेऊन चालण्याचा सराव करीत होतो. पण, शूटिंगच्या अगदी काही दिवस आधी मला माझ्या मित्रानं सांगितलं की तुझ्याऐवजी ती भूमिका संजीव कुमार साकारणार आहेत.
“तुम्ही सर्वांत मोठे खोटारडे…”
चित्रपटातून काढल्याचं समजताच अनुपम खेर यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. पण, त्याआधी महेश भट्ट यांना फोन करून चित्रपटातून का काढलं, हे विचारायचं ठरवलं. अनुपम खेर म्हणाले, “मी महेश भट्ट यांना फोन केला. त्यांनी मला सांगितले की, निर्मात्याची इच्छा आहे की, संजीव कपूर यांना ती भूमिका करावी; पण तू काळजी करू नकोस. तू दुसऱ्या वृद्ध व्यक्तीची भूमिका कर. तीसुद्धा त्या भूमिकेइतकीच चांगली आहे. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर मी माझी बॅग भरली. मी विचार केला की सहा महिने एका भूमिकेची तयारी केल्यानंतर ते मला अशा प्रकारे चित्रपटातून बाहेर काढू शकतात, तर माझे भविष्य काय असेल?”
त्यानंतर अनुपम खेर महेश भट्ट यांच्या घरी गेले. कारण- त्यांना त्यांच्याशी समोरासमोर बोलायचे होते. ते महेश भट्ट यांना म्हणाले, “तुम्हाला ती टॅक्सी दिसत आहे का? त्यामध्ये माझं साहित्य आहे. मी हे शहर सोडून जात आहे. पण, जाण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की, तुम्ही पृथ्वीवरील सर्वांत मोठी फ्रॉड व्यक्ती आहात. तुम्ही सर्वांत मोठे खोटारडे आहात.”
“तुम्ही सत्यावर आधारित आशय असलेला चित्रपट बनवत आहात. पण, तुमच्यामध्ये ते सत्य नाही. सहा महिने तुम्ही मला सराव करायला सांगितले आणि आता तुम्ही मला चित्रपटातून अशा रीतीनं बाहेर काढत आहात. त्यानंतर मी त्यांना म्हणालो की, मी ब्राह्मण आहे आणि मी तुम्हाला शाप देतो. त्यानंतर महेश भट्ट यांनी निर्मात्याला फोन केला आणि सांगितले की, आता जो यानं सीन केला, तो सीन फक्त हाच करू शकतो”, अशा प्रकारे त्यांना पहिली भूमिका मिळाली, याची आठवण अनुपम खेर यांनी सांगितली.
दरम्यान, सारांश हा चित्रपट १९८४ साली प्रदर्शित झाला होता.