अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

अनेक दिवसांपासून सर्वत्र अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची चर्चा रंगली होती. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत जोरदार तयारी करण्यात आली होती. मंदिर परिसरालाही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या सोहळ्यात आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराना, रोहित शेट्टी, अनुपम खेर, कंगना राणौत, माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे सहभागी झाले होते. या सोहळ्यादरम्यानचा अनुपम खेर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा- आर्यन खान विद्यार्थी म्हणून कसा होता? USC तील डीन आणि प्राध्यापिकेने केला खुलासा; म्हणाल्या, “त्याच्या वडिलांनी…”

अनुपम खेर यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुपम खेर आपला चेहरा झाकून राम मंदिरात गेल्याचे दिसून येत आहे. आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी डोक्यावर टोपी घातली होती आणि मफरलने आपला चेहरा झाकून घेतला होता. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी मंदिरात प्रचंड गर्दी होती. या गर्दीतही सामान्य माणसाप्रमाणे अनुपम खेर यांनी रामाचे दर्शन घेतले.

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करीत लिहिले, “कृपया शेवटपर्यंत पाहा. राम मंदिरात निमंत्रित पाहुणा म्हणून गेलो होतो; पण आज सगळ्यांसोबत शांतपणे मंदिरात जावंसं वाटलं. असा भक्तीचा सागर पाहिला की, मन आनंदानं भरून आलं. रामजींच्या दर्शनासाठी लोकांचा उत्साह आणि भक्ती दिसून येत होती. मी निघायला लागलो तेव्हा एक भक्त माझ्या कानात कुजबुजत म्हणाला, ‘भाऊ, चेहरा झाकून काही होणार नाही. रामलल्लानं तुम्हाला ओळखलं आहे जय श्रीराम.’ ” अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.