दिग्दर्शक अनुराग कश्यप खूप शिस्तबद्ध पद्धतीने जीवन जगतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अनुराग कश्यपकडे फक्त एकच कार आहे. ही कार अनुराग कश्यप व त्याची मुलगी आलिया दोघेही वापरतात. अनुरागची ही कार लक्झरी कार नाही. तो महिंद्राची कार वापरतो. महिंद्राच्या या कारची देखभाल करणं परवडणारं आहे, असं अनुराग म्हणतो.

Anurag Kashyap owns Mahindra car : अनुरागकडे महिंद्रा XEV 9e ही कार आहे. महिंद्रा XEV 9e च्या टॉप मॉडेलची किंमत ३० लाख रुपये आहे. तुझ्याकडे किती गाड्या आहेत? असं अनुराग कश्यपला विचारण्यात आलं. तो अभिमानाने म्हणाला, “माझ्याकडे एक कार आहे आणि मी व माझी मुलगी दोघेही ती कार वापरतो. माझ्याकडे महिंद्राची गाडी आहे. माझ्या मित्रांनी ऑडी, मर्सिडीज खरेदी केली. पण जेव्हा मुंबईत पाऊस पडतो आणि पूर येतो तेव्हा त्यांच्या गाड्या बंद पडतात आणि त्या दुरुस्त करण्यासाठी खूप पैसे खर्च होतात. त्या किमतीच्या निम्म्या किमतीत, तुम्ही महिंद्रा खरेदी करू शकता. मी महिंद्राशिवाय दुसरी कोणतीही कार कधीही खरेदी केलेली नाही.” अनुरागने मार्च २०२५ मध्ये ही कार खरेदी केली आणि त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

आयुष्यात शांतता हवीये- अनुराग कश्यप

गेम चेंजर्स या यूट्यूब चॅनलवर बोलताना अनुरागने त्याला बंगला किंवा महागड्या गाड्यांची कोणतीही आवड नसल्याचं स्पष्ट केलं. आयुष्यात शांततेला प्राधान्य देत असल्याचं अनुरागने सांगितलं. “मला मोठी इमारत किंवा बंगला नकोय. मी अजूनही वर्सोवा (मुंबई) इथे राहतो आणि मी तिथे खूप आनंदी आहे. मी आता बेंगळुरूला शिफ्ट झालो आहे आणि मी आता इंडस्ट्रीपासून थोडा दूर असल्याने मला आनंद आहे. पण मी सतत काम करत आहे. मी काम करणं थांबवलेलं नाही,” असं अनुराग कश्यप म्हणाला.

चित्रपटांच्या बजेटबद्दल अनुराग कश्यप म्हणाला…

कमी बजेटमध्ये चित्रपट तयार करण्याबद्दल अनुरागने त्याचं मत व्यक्त केलं. चित्रपटासाठी अनावश्यक खर्च करू नका, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहू नका. तुम्हाला हवा तसा चित्रपट बनवा, पण दुसऱ्याचे नुकसान करू नका. चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठी समस्या म्हणजे तुम्ही तो चित्रपट दुसऱ्याच्या पैशांवर बनवत असतात, असं अनुराग म्हणाला. अनुरागने त्याच्यामुळे निर्मात्यांना नुकसान झालेला चित्रपट कोणता, त्याबद्दलही सांगितलं. ‘बॉम्बे व्हेलवेट’ या चित्रपटामुळे निर्मात्यांचं नुकसान झालं. कारण त्याचे बजेट २८ कोटी रुपये ठरले होते, पण वाढत वाढत ते तब्बल ९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. चित्रपट फ्लॉप ठरला आणि निर्मात्यांना याचा मोठा फटका बसला.

अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेला ‘निशांची’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याचा ‘बंदर’ हा चित्रपट टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. या चित्रपटात बॉबी देओल, सान्या मल्होत्रा, सबा आझाद आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.