Marathi Actress Talk’s About Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर त्यांनी त्यांच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे अनेक कलाकारांना त्यांच्यासह काम करण्याची इच्छा असते. अशातच आता लोकप्रिय मराठी अभिनेत्रीनेही बिग बींसह काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला आहे.

हिंदी-मराठी चित्रपटांत काम करीत प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अनुषा दांडेकर. अनुषाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये बिग बींसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अनुषाने ‘विरुद्ध’ या चित्रपटात अमिताभ बच्चन व जॉन अब्राहमसह काम केले होते. अशातच अभिनेत्रीने आता त्यांच्यासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

अनुषा दांडेकरने सांगितला अमिताभ बच्चन यांच्यासह काम करण्याचा अनुभव

अनुषाने ‘झूम’शी संवाद साधताना सांगितले, “मला अजूनही अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा चित्रीकरणाचा पहिला दिवस आठवतो. मी खूप घाबरले होते आणि एका कोपऱ्यात सीनची तालीम करत होते. तेव्हा जॉन अब्राहम आला आणि म्हणाला, “जर तू तुझे वाक्य विसरलीस, तर मिस्टर बच्चन तुला खूप ओरडतील. त्यानंतर मला खूप भीती वाटली होती. मी अजून काळजीपूर्वक माझं काम करत होते. पण जेव्हा मी वर पाहिलं, तर मला जॉन व अमिताभ बच्चन माझ्याकडेच बघत असल्याचं दिसलं. तेव्हा ते दोघे माझ्याकडे बघून हसत होते. तेव्हा समजलं की, ते प्रँक करत होते”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुषा दांडेकरने पुढे अमिताभ यांचे कौतुक केले. ती म्हणाली, “त्यांच्याबरोबर काम करणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना ‘विरुद्ध’ या चित्रपटाच्या सेटवर काम करताना मी पाहत होते तेव्हा त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं.” पुढे अनुषा म्हणाली, “ऑनस्क्रीनवरील ते माझं पहिलं लग्न होतं. विरुद्ध या चित्रपटाला १९ वर्षं झाली. खूप उत्कृष्ट चित्रपट होता तो. मी महेश मांजरेकर यांचे यासाठी आभार मानते. कारण- त्यांच्यामुळे मला इतक्या चांगल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.”

दरम्यान, अनुषाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ‘दिल्ली बेली’, ‘मुंबई मॅटिनी’ आणि ‘अँथनी कौन है’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती नुकतीच महेश मांजरेकर यांच्या ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटामध्ये झळकली होती.