भारतीय फलंदाज विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या खूपच चर्चेत आहेत. १५ फेब्रुवारीला अनुष्काने एका गोंडस मुलाला जन्म दिला. अनेक दिवसांपासून त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर अनुष्काने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत दुसऱ्यांदा आई झाल्याची बातमी दिली. दोघांनी त्यांच्या मुलाचे नाव ‘अकाय’ असे ठेवले आहे.
विराट व अनुष्काच्या दुसऱ्या बाळाचा जन्म लंडनमध्ये झाला आहे. त्यामुळे त्याला ब्रिटिश नागरिकत्व मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. अकायच्या नागरिकत्वाबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विराट व अनुष्का भारतीय आहेत; पण त्यांच्या मुलाचा जन्म लंडनमध्ये झाला आहे. त्यामुळे त्याला ब्रिटिश नागरिकत्व मिळणार की भारतीय, याबाबत चाहते जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
ब्रिटिश नागरिकत्व मिळवण्यासाठी काय आहेत नियम?
ब्रिटिश सरकारच्या नियमांनुसार तेथील नागरिक होण्यासाठी बाळाच्या पालकांपैकी किमान एक जण ब्रिटिश नागरिक असला पाहिजे किंवा त्यांनी तिथे बराच काळ वास्तव्य केलेले असावे. तसेच ब्रिटिश नागरिकत्व असणाऱ्या व्यक्तीचे मूल जरी दुसऱ्या देशात जन्माला आले तरी त्याला आपोआप ब्रिटिश नागरिकत्व मिळते.
विराट-अनुष्काचा मुलगा ‘अकाय’ लंडनमध्ये जन्माला आला असला तरी त्याला ब्रिटिश नागरिकत्व मिळणार नाही. कारण- त्याचे आई-वडील दोघेही भारतीय आहेत. ‘अकाय’ला ब्रिटनचा पासपोर्ट मिळेल; मात्र त्याला भारतीय नागरिक म्हणूनच मान्यता दिली जाईल.
‘अकाय’चा अर्थ काय?
विराट-अनुष्काने मुलाचे नाव जाहीर केल्यापासून अनेकांना ‘अकाय’चा अर्थ नेमका काय, असा प्रश्न पडला होता. हिंदी शब्दकोश व संस्कृत भाषेनुसार ‘अकाय’ नावाचा अर्थ ‘निराकार’, असा होतो. ज्याला कोणतेही स्वरूप, देह व आकार नाही, तो निराकार. तसेच तुर्की भाषेनुसार या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणारा चंद्र (Shining moon), असा आहे.