Govardhan Asrani Net Worth: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांचे २० ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी निधन झाले. असरानी यांनी ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. असरानी मागील काही दिवसांपासून आजारी होते, अशी माहिती त्यांचे मॅनेजर बाबूभाई थीबा यांनी दिली.
१५-२० दिवसांपासून असरानी आजारी होते. त्यांचे सोमवारी, २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात निधन झाले, असं बाबूभाई थीबा एएनआयशी बोलताना म्हणाले. असरानी यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या निधनाची बातमी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केली. “आम्हा सर्वांचे लाडके, सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे असरानी आता आमच्याबरोबर नाहीत. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेमा व आमच्या मनात कधीही न भरून निघणारी पोकळी तयार झाली आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाने सोडलेली अमिट छाप कायम राहील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती,” असं पोस्टमध्ये लिहिलं.
असरानी यांचा जन्म व करिअरची सुरुवात
गोवर्धन असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) येथे व्हॉइस आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी साहित्य कलाभाई ठक्कर यांच्याकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि १९६२ मध्ये चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मुंबईत आले.
मुंबईत असरानी यांची भेट प्रसिद्ध चित्रपट निर्माते हृषिकेश मुखर्जी यांच्याशी झाली. मुखर्जींनी त्यांना पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर असरानी यांनी १९६६ मध्ये तिथून पदवी पूर्ण केली. पण सुरुवातीला त्यांना फारशा संधी मिळाल्या नाहीत. त्यांनी ‘हम कहाँ जा रहे हैं,’ ‘हरे कांच की चुडियां,’ ‘उमंग,’ आणि ‘सत्यकाम’ सारख्या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या.
मुंबईत संघर्ष करताना उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी एफटीआयआयमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. हा त्यांच्या करिअरला कलाटणी देणारा टप्पा ठरला. हृषिकेश मुखर्जी एफटीआयआयमध्ये गेस्ट फॅकल्टी म्हणून काम करत होते आणि गुलजार यांच्या शिफारशीवरून ते असरानी यांना भेटले. त्यांना तेव्हा त्यांच्या ‘गुड्डी’ (१९७१) या चित्रपटात जया भादुरी यांना घ्यायचं होतं.

असरानी यांनी ऋषिकेश यांची भेट जयाशी करून दिली. त्याचदरम्यान असरानी यांनीही ऑडिशन दिली आणि ‘गुड्डी’ सिनेमात काम मिळालं. असरानी व जया यांचा हा चित्रपट हिट झाला आणि नंतर त्यांनी अनेक चित्रपट केले.
असरानी यांनी ४०० हून जास्त चित्रपटांमध्ये केल्या भूमिका
असरानी यांनी आपल्या करिअरमध्ये ४०० हून जास्त चित्रपट केले. त्यात हिंदी, गुजराती व दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे. ‘बावर्ची’, ‘नमक हराम’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘चला मुरारी हीरो बनने’, ‘पति पत्नी और वो’, ‘परिचय’, ‘छोटी सी बात’, ‘रफू चक्कर’, ‘खून पसीना’, ‘अलाप’, ‘अमदावाद नो रिक्शावाला’, ‘सात कैदी’, ‘संसार चक्र’ और ‘पंखी नो माल’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होय. पण ते ‘शोले’ मधील जेलरच्या भूमिकेसाठी खास ओळखले जातात.
असरानी यांची संपत्ती किती?
आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना हसवणारे गोवर्धन असरानी आता आपल्यात नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची संपत्ती ४० ते ४५ कोटी रुपये आहे. असरानी यांचे उत्पन्नाचे स्रोत चित्रपट, टीव्ही शो, जाहिराती होते. असरानी यांचं मुंबईत घरदेखील आहे.
