Ayushmann Khurrana’s Andhadhun To Alia Bhatt’s Darlings Watch This 7 Dark Comedy Movies : सध्या थ्रीलर, हॉरर, कॉमेडी व डार्क कॉमेडी अशा चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. अशा चित्रपटांना त्यांची पसंती मिळताना दिसते. त्यामुळेच आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील ७ डार्क कॉमेडी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये आलिया भट्टच्या ‘डार्लिंग’ ते आयुष्मान खुरानाच्या ‘अंधाधुन’ अशा जबरदस्त चित्रपटांचा समावेश आहे.
‘दिल्ली बेली’ २०११
‘दिल्ली बेली’मध्ये इमरान खान, आमिर खान, कुणाल रॉय कपूर, वीर दास, अनुषा दांडेकर, शिल्पा मेहता हे कलाकार पाहायला मिळतात. यामध्ये तीन मित्र हिऱ्याची तस्करी करणाऱ्याच्या जाळ्यात अडकतात. यामध्ये बोल्ड, थ्रीलर, हिंसा या गोष्टींचं काँबीनेशन असल्याचं पाहायला मिळतं.
‘डार्लिंग’ २०२२
‘डार्लिंग’ चित्रपटात आलिया भट्ट महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तिच्यासह यामध्ये अभिनेता विजय वर्मा, शेफाली शाह, विक्रम प्रताप, रोशन मेथीव हे कलाकार पाहायला मिळतता. यामध्ये आई व तिची मुलगी अत्याचारी नवऱ्याविरुद्ध उभ्या राहतात. ‘नेटफ्लिक्स’वरील या डार्क कॉमेडी चित्रपटात सत्य आणि विनोद पाहायला मिळतो.
‘अंधाधून’ २०१८
आयुष्मान खुरानाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शन केलं होतं. अभिनेत्री तब्बूही यात महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकलेली. पियानो वाजवून घर खर्च चालवणाऱ्या आकाशला पियानोची प्रचंड आवड असते व त्याचं लंडनला जाऊन पियानो शिकण्याचं स्वप्न असतं. पण, अचानक एके दिवशी तो गुन्ह्याच्या जाळ्यात अडकतो. हत्येप्रकरणी तो घटनास्थळी असल्याने पोलिसांना जबाब देणं त्याला भाग पडतं. हा गुंता सोडवण्याच्या प्रयत्नात त्याला पुढे बऱ्याच अडचणी येतात. यातूनच तयार होतो उत्कंठावर्धक आणि शेवटपर्यंत कथेशी जोडून ठेवणारा ‘अंधाधून’
‘पीपली लाईव्ह’ २०१० (Peepli Live)
आमिर खानची निर्मिती असलेला हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या करण्याची घोषणा करतो, त्या वेळी राजकारणी आणि वृत्तमाध्यमं त्याचा कसा फायदा उचलतात हे चित्रपटात पाहायला मिळतं. यामध्ये ओमकार दास मानिकपुरी, नवाजुद्दीन सिद्दीकी, नसरुद्दीन शाह हे कलाकार झळकले होते.
‘इश्किया’ २०१०
२०१० साली आलेल्या ‘इश्किया’ चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक चौबेने केलं आहे. यामध्ये नसीरुद्दीन शाह, विद्या बालन आणि अर्शद वारसी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची कथा दोन गुन्हेगारांभोवती फिरते, जे एका विधवेला फसवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यातच ते दोघेही तिच्या जाळ्यात अडकतात.
‘ब्लॅकमेल’ २०१८
‘ब्लॅकमेल’ हा दिवंगत अभिनेते इरफान खान यांची मुख्य भूमिका असलेला व अभिनय देव दिग्दर्शित कॉमेडी थ्रीलर चित्रपट आहे. इरफान खानसह यामध्ये कीर्ती कुल्हारी, अरुणोदय सिंग आणि दिव्या दत्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत. देव कौशल (इरफान खान) नावाच्या व्यक्तीभोवती फिरते, जो त्याच्या पत्नीला (किर्ती कुल्हारी) तिच्या प्रियकराबरोबर (अरुणोदय सिंग) रंगेहाथ पकडतो. त्यानंतर तो या दोघांना ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो, अशी काहीशी कथा या चित्रपटाची आहे.
‘जाने भी दो यारो’ १९८३
कुंदन शाह दिग्दर्शित या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, सतीश शाह, रवी बास्वीनी, सतीश कौशीक पंकज कपूर, भक्ती बर्वे हे कलाकार पाहायला मिळतात. या चित्रपटात दोन फोटोग्राफर्स, जे एका वृत्तपत्र संपादकाकडून श्रीमंतांच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी नेमलेले असतात, त्यांना एका बिल्डरने केलेला भ्रष्टाचार समजतो आणि ते दोघे हे प्रकरण उघडकीस आणतात.