ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र त्यांच्या करिअरइतकेच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले. विवाहित धर्मेंद्र चित्रपटांमध्ये काम करण्यासाठई पंजाबहून मुंबईत आले होते. धर्मेंद्र सुपरस्टार झाल्यावर त्यांच्या कुटुंबाचं नशीब पालटलं. पण त्यांच्या पत्नी प्रकाश कौर यांना मोठा धक्का पचवावा लागला. कारण धर्मेंद्र हेमा मालिनींच्या प्रेमात पडले आणि ४ अपत्ये असूनही त्यांनी लग्न केले.
धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या लग्नामुळे कुटुंबात दरी निर्माण झाली. हेमा मालिनी लग्नानंतर त्यांच्या स्वतःच्या बंगल्यात स्वतंत्रपणे राहिल्या तर धर्मेंद्र त्यांच्या पहिल्या पत्नी आणि चार मुलांसह त्यांच्या घरी राहत होते. हेमा यांची मुलगी ईशा देओलने एकदा सांगितलं की ती ३० वर्षांची असताना प्रकाश कौर यांना भेटली होती. आता एका मुलाखतीत, धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा बॉबी देओलने आई-वडिलांबद्दल एक खुलासा केला आहे. प्रकाश कौर व धर्मेंद्र त्यांच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये एकत्र राहत आहेत, असं त्याने सांगितलं.
धर्मेंद्र कुठे राहतात?
बॉबी देओलने नुकतीच एबीपी लाईव्हला मुलाखत दिली. धर्मेंद्र सोशल मीडियावर अशा पोस्ट करतायत, त्यावरून ते एकटे असल्याचं वाटतं असं बॉबीला विचारण्यात आलं. बॉबी म्हणाला, “माझी आईही तिथे आहे. ते दोघेही सध्या खंडाळा येथील फार्म हाऊस राहत आहेत. पप्पा आणि मम्मी एकत्र आहेत. पप्पा कधी कधी थोडे ड्रामा करतात. त्यांना फार्महाऊसमध्ये राहायला आवडतं. आता त्यांचं वय झालंय, त्यामुळे फार्महाऊसमध्ये राहणं त्यांच्यासाठी आरामदायी आहे. तिथलं हवामान छान आहे, जेवण छान आहे.”
धर्मेंद्र यांना व्यक्त व्हायला आवडतं
बॉबी पुढे म्हणाला, “बाबा खूप भावनिक आहेत. त्यांना व्यक्त खूप व्हायला खूप आवडतं. त्यांना जे वाटतं ते सर्वांबरोबर शेअर करतात… कधीकधी ते जास्त बोलतात. मग मी त्यांना विचारतो की त्यांनी जे लिहिलं ते का लिहिले किंवा जे म्हटलं ते का म्हटलं. मग ते मला सांगतात की ते फक्त त्यांच्या मनाचं ऐकतात. आम्ही त्यांना भेटतो, पण आम्ही कधीकधी व्यग्र असतो तेव्हा ते भावुक होतात आणि पोस्ट करतात. पण त्यांच्या पोस्ट किती लोक वाचत असतात याची त्यांना कल्पना नाही.”
बॉबी देओल आईबद्दल म्हणाला…
बॉबी देओल त्याची आई प्रकाश कौरबद्दलही व्यक्त झाला. “माझ्या आईबद्दल तुम्हाला फारसं ऐकायला मिळत नाही कारण लोक सहसा आम्हाला तिच्याबद्दल विचारत नाहीत. आणि माझा भाऊ आणि वडील अभिनेते असल्याने, मी त्यांच्याबद्दल जास्त बोलतो. माझी आई गृहिणी आहे आणि मी तिचा लाडका आहे. आम्ही दररोज बोलतो. खरं तर, तिने मला आजच दोनदा फोन केला. ती माझ्या आयुष्यातील सर्वात स्ट्राँग महिला आहे. तिचा प्रवास खूप कठीण होता. ती एका लहान गावातून आली होती आणि राहण्याची पद्धत खूप सोपी होती. आणि मग, एका सुपरस्टारची पत्नी म्हणून शहरी जीवनाशी जुळवून घेणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. मी आज जे आहे ते माझ्या पत्नीमुळे आहे आणि माझ्या वडिलांचंही असंच आहे. माझ्या आईच्या पाठिंब्यामुळेच माझे वडील मोठे स्टार बनले,” असं बॉबी देओलने नमूद केलं.
धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचे लग्न १९५४ साली झाले. तेव्हा धर्मेंद्र फक्त १९ वर्षांचे होते. या जोडप्याला चार अपत्ये आहेत. मुलं सनी आणि बॉबी देओल आणि मुली अजिता आणि विजेता. काही वर्षांनंतर, १९७० मध्ये, धर्मेंद्र हेमा मालिनी यांना ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री लवकरच खऱ्या प्रेमात रूपांतरित झाली. हेमा यांच्या कुटुंबाकडून या लग्नाला विरोध झाला होता. पण तरीही त्यांनी १९८० मध्ये लग्न केले. या दोघांना ईशा आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.