‘भूल भुलैया’मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदीच्या भूमिकेतील अभिनेता आठवतो का? ‘गँगस्टर’सह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये या अभिनेत्याने काम केलं. पण बलात्काराच्या प्रकरणात अडकला आणि त्याचं फिल्मी करिअर संपलं. या अभिनेत्याचं नाव शायनी आहुजा होय. शायनी आहुजा आता कुठे राहतो, काय करतो? याबद्दल माहिती समोर आली आहे.
शायनी आहुजाचे वडील भारतीय लष्करातील कर्नल होते आणि आई गृहिणी होती. शायनी दिल्लीत वाढला आणि बंगळुरूमधून त्याने इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं. थिएटर दिग्दर्शक बॅरी जॉनला भेटल्यानंतर त्याने थिएटर करायचं ठरवलं. नंतर शायनी जाहिरातींमध्ये काम करू लागला. लवकरच तो जाहिरात क्षेत्रातील एक लोकप्रिय चेहरा बनला. कॅडबरी आणि सिटीबँक सारख्या अनेक टॉप ब्रँडच्या जाहिरातीत त्याने काम केलं. निर्माते सुधीर मिश्रा यांनी शायनीला पेप्सीच्या जाहिरातीत पाहिलं आणि तिथून त्याचा बॉलीवूडमधील प्रवास सुरू झाला.
सुधीर मिश्रांनी त्याला ‘हजारों ख्वाहिशे ऐसी’ मध्ये मुख्य भूमिकेत घेतलं. या चित्रपटात शायनीबरोबर के के मेनन, चित्रांगदा सिंह आणि सौरभ शुक्ला होते. शायनीने त्याच्या पदार्पणाच्या वर्षात एक नाही तर चार चित्रपट केले. पण त्याला खरी ओळख ‘गँगस्टर’मधून मिळाली. ‘गँगस्टर’मधून कंगना रणौतने बॉलीवूड पदार्पण केलं होतं. ‘गँगस्टर’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि शायनीला आणखी चित्रपट मिळाले. त्याने ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ… मेट्रो’, आणि ‘भूल भुलैया’सारखे सिनेमे केले.
शायनी आहुजाच्या करिअरला लागली उतरती कळा
२००९ मध्ये शायनी आहुजा बातम्यांमध्ये आला. त्याचं कारण म्हणजे त्याच्यावर झालेले गंभीर आरोप. घरी काम करणाऱ्या १९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणे, तिला ताब्यात ठेवणे आणि धमकी देणे या आरोपाखाली शायनीला अटक झाली आणि त्याच्या करिअरला ब्रेक लागला. काही महिन्यांनंतर, त्याला दिल्ली न सोडण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला.
तक्रारदार तरुणीने नंतर तिचा जबाब मागे घेतला. पण २०११ मध्ये, मुंबईतील एका जलदगती न्यायालयाने आहुजाला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवलं आणि त्याला सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. वैद्यकीय अहवाल, डीएनए पुरावे आणि पीडितेच्या सुरुवातीच्या जबाबावर आधारित ही शिक्षा सुनावण्यात आली होती. पण शायनीने मुंबई उच्च न्यायालयात या आदेशाविरुद्ध अपील केले आणि त्याची अपील स्वीकारण्यात आली आणि नंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता.
कमबॅकचा प्रयत्न
शायनी आहुजाने बॉलीवूडमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न केला. २०१५ मध्ये अनीस बझमीच्या ‘वेलकम बॅक’ या चित्रपटात तो झळकला. हा चित्रपट हिट झाला, पण त्याचा शायनीला फार फायदा झाला नाही. हा हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.
शायनी आहुजा आता काय करतो?
मुंबई उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये शायनी आहुजाला १० वर्षांसाठी त्याचा पासपोर्ट रिन्यू करण्याची परवानगी दिली. नुकतीच एक्सवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यानुसार शायनी आहुजा आता फिलीपिन्समध्ये स्थायिक झाला आहे आणि तिथे कपड्यांचा व्यवसाय करत आहे.
