ट्रेन व बसने प्रवास करताना महिलांना अनेकदा वाईट अनुभव येतात. चुकीच्या पद्धतीने स्पर्श, छेडछाड असे प्रकार महिलांबरोबर घडतात. आता एका बॉलीवूड अभिनेत्रीने तिला लोकल ट्रेनमध्ये आलेला धक्कादायक अनुभव सांगितला. तसेच वजन कमी असल्याने तिची लोक खिल्ली उडवायचे, असंही ती म्हणाली.

ही अभिनेत्री म्हणजे डायना पेंटी. डायनाने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. तिने नुकतीच हॉटरफ्लायला मुलाखत दिली. मुलाखतीत तिने मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये आलेले वाईट अनुभव सांगितले. लोकलने प्रवास करायला भीती वाटायची, असंही तिने नमूद केलं.

डायना पेंटी म्हणाली, “मला वाटतं मुंबईतील प्रत्येक मुलीने कधी ना कधी हा अनुभव घेतला असेल. सेंट झेवियर्स कॉलेजला जाण्यासाठी मी भायखळा ते व्हीटीपर्यंत सेंट्रल लाईन ट्रेनने जायचे आणि नंतर कॉलेजला चालत जायचे. ट्रेनमध्ये छेडछाड व्हायची आणि लोक मला धक्के मारायचे. खरं तर हे रोजचंच झालं होतं. मी खूप लाजाळू, कमी आत्मविश्वास असलेली, सावध आणि विचित्र मुलगी होते. मला भीती वाटायची त्यामुळे मी त्यांना परत मारू शकत नव्हते किंवा नडू शकत नव्हते.”

डायनाची खिल्ली उडवायचे लोक

डायनाने सांगितलं की ती लहानपणी खूप बारीक होती आणि लोक तिच्या शरीरयष्टीची खिल्ली उडवायचे. या सगळ्यामुळे तिला खूप त्रास व्हायचा. “यामुळे मला खूप त्रास झाला. तुम्ही लहान असता आणि लोक तुम्हाला म्हणत असतात की तू खूप बारीक आहेस, तू जेवत नाहीस का? असं मला म्हणायच्या. माझ्या आईजवळही माझ्याबद्दल बोलायच्या. आई खूप चिडायची. मी माझ्या मुलीला खायला घालत नाही का? असं ती म्हणायची. मी बारीक असल्याने लहानपणी मला जे बोललं गेलं ते सगळं खूप भयंकर होतं,” असं डायना म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डायना पेंटीचे करिअर

डायना पेंटी शेवटची अजय देवगणबरोबर ‘आझाद’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसली होती. सध्या ती दिलजीत दोसांझबरोबर ‘डिटेक्टिव्ह शेरदिल’ चित्रपटात काम करतेय. हा चित्रपट Zee5 वर प्रसारित होणार आहे. यानंतर तिचा ‘सेक्शन 84’ हा चित्रपट येणर आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन आणि निमरत कौर देखील दिसणार आहेत.