Bollywood Actress Reaction OnTrolling : २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी टाकण्यात आली. तसेच अनेक पाकिस्तानी लोकांचे सोशल मीडिया अकाऊंटही बॅन करण्यात आले. याचदरम्यान ‘अबीर गुलाल’ या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटात बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर मुख्य भूमिकेत होती. मात्र, हल्ल्यांनंतर तिने सोशल मीडियावरून ‘अबीर गुलाल’शी संबंधित सगळे फोटो-व्हिडीओ डिलीट केले होते.
दरम्यान, अभिनेत्रीला सोशल मीडियावर खूप ट्रोलिंग आणि नकारात्मकता सहन करावी लागली होती. त्या परिस्थितीबद्दल आता वाणीने पहिल्यांदाच तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याबद्दल ती म्हणाली, “गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरील वातावरण खूपच नकारात्मक झालं आहे.”
नंतर वाणी म्हणते, “आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत करतो, तेच पुन्हा आपल्याबरोबरही घडतं. त्यामुळे आपण कायम आपल्यातील द्वेष कमी करून प्रेम वाढवलं पाहिजे. आपण कोणाबद्दल द्वेष पसरवू किंवा दुसऱ्याला ट्रोल करत असू, तर ते कधी ना कधी आपल्या बाबतीतही घडू शकतं. माणूस म्हणून एकमेकांशी नीट वागलं पाहिजे. त्यामुळेच आपण आनंदी राहू.”
वाणी कपूर इन्स्टाग्राम पोस्ट
‘मंडला मर्डर्स’ या आगामी सीरिजच्या ट्रेलर लाँचदरम्यान वाणीने तिच्या भावना व्यक्त केल्या. या सीरिजमधून वाणी ओटीटी विश्वात पदार्पण करीत आहे. या सीरिजमध्ये वाणी कपूरबरोबर वैभव राज गुप्ता, सुरवीन चावला, श्रिया पिळगावकर व रघुबीर यादव या कलाकारांच्याही भूमिका आहेत. ही सीरिज २५ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
वाणी कपूरच्या ‘मंडला मर्डर्स’बद्दल सांगायचं झाल्यास, ही एक पौराणिक-गुन्हेगारी थरारक सीरिज आहे. या सीरिजमध्ये प्राचीन रहस्यं, विचित्र चिन्हं व काही विधींच्या आधारे घडणाऱ्या खुनांचा केलेला तपास पाहायला मिळणार आहे. या सीरिजची निर्मिती व दिग्दर्शन गोपी पुथरन यांनी केलं आहे. मनन रावत हे सीरिजचे सह-दिग्दर्शक आहेत.
दरम्यान, वाणीबद्दल बोलायचं झालं, तर तिनं आपल्या करिअरची सुरुवात २०१३ मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटामधून केली होती. त्यानंतर ती ‘बेफिकरे’, ‘वॉर’ व ‘शमशेरा’ यांसारख्या चित्रपटांत झळकली आहे. अशातच आता ती सीरिजद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.