बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने ‘गलवान’चा उल्लेख करत केलेल्या ट्वीटमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. रिचाने भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा दावा करत सोशल मीडियावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रिचाने भारतीय लष्करातील उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना हे विधान केलं होतं. दरम्यान वाद वाढू लागल्यानंतर रिचाने जाहीर माफी मागितली असून कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचं स्पष्ट केलं. पण या माफीचा काहीच फायदा झाला नसून हा वाद आणखीनच वाढला आहे.

सोशल मीडियावर तिच्या चित्रपटांना बॉयकॉट करण्याची मागणी होताना दिसत आहे. याबरोबरच बॉलिवूडमधील कलाकारांनीही ट्वीट करत रिचाची चांगलीच कानउघडणी केली आहे. अक्षय कुमारनेही या गोष्टीचे खंडन केलं आहे. एकूणच हा वाद आणखीन वाढताना दिसत आहे. अशातच प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीदेखील रिचाच्या विरोधात कायदेशीर कारवाई केल्याचं वृत्त समोर आलं आहे. अशोक पंडित हे ‘फिल्म टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे’चे अध्यक्ष आहेत.

आणखी वाचा : “जर पुन्हा लॉकडाऊन लागला तर…” दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी व्यक्त केली वेगळीच इच्छा

अशोक पंडित यांनी ट्विटरच्या माध्यमातून रिचाच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. ट्वीट करत अशोक पंडित यांनी तक्रारीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी जुहू पोलिस स्टेशनमध्ये रिचाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. देशातील सैनिकांचा अशा रितीने अपमान करणाऱ्या रिचा चड्ढाच्या विरोधात त्वरित कारवाई करायला हवी अशी भूमिका त्यांनी या ट्वीटमधून मांडली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांबरोबरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत याविरोधात कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. अशोक पंडित हे या अशा वादग्रस्त घटनांच्या बाबतीत कायम आवाज उठवत असतात, शिवाय ते चित्रपटसृष्टीत असूनही कोणाचीही भीती न बाळगता ते आपलं मत परखडपणे सोशल मीडियावर मांडत असतात. रिचा चड्ढाने नुकतीच अभिनेता अली फजलबरोबर लग्नगाठ बांधली आहे, यामुळे ती चांगलीच चर्चेत होती. तिच्या या अशा वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा बॉयकॉट ट्रेंड जोर धरू लागला आहे.