Chhaya Kadam Wins Filmfare : मनोरंजनसृष्टीत महत्त्वाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच गुजरात येथे पार पडला. या कार्यक्रमाला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. यंदा शाहरुख खान व करण जोहर यांनी हा भव्यदिव्य सोहळा होस्ट केला होता. ७० व्या फिल्मफेअर सोहळ्यात किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं.
फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये मराठमोळ्या छाया कदम यांना ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ‘लापता लेडीज’ सिनेमात त्यांनी साकारलेल्या ‘मंजू माई’ या पात्रासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पहिलाच फिल्मफेअर जिंकल्यावर अभिनेत्री भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. हा क्षण छाया कदम यांच्यासाठी खूपच खास होता. त्या भावना व्यक्त करत काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊयात…
छाया कदम सांगतात, “प्रत्येकवेळी असं वाटायचं की आता मला पुरस्कार मिळेलच. सगळेजण कौतुक करायचे पण पुरस्कार काही केल्या मिळत नव्हता. यावेळी विचार करून ठेवला होता, अवॉर्ड मिळो किंवा न मिळो… मस्त तयार होऊन आपण या सोहळ्याला जायचं. थँक्यू सो मच! किरण आय लव्ह यू…तू माझ्यावर इतका विश्वास ठेवलास. एका मराठी मुलीला तू युपीमधली मंजू माई बनवलंस…मला स्वत:ला खात्री नव्हती की, मी खरंच ही भूमिका करेन की नाही. पण, किरण तू नेहमी मला विश्वास दिलास. मी आज जास्त काही बोलणार नाही. हा पुरस्कार त्या सगळ्यांसाठी आहे जे लोक इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षे काम करत आहेत आणि नेहमी विचार करतात…कधी होणार? कधी पुरस्कार मिळेल? मेरा टाइम कब आएगा? त्या सगळ्यांसाठी हा पुरस्कार आहे.”
…अन् शाहरुख खानची भेट झाली, स्वप्न पूर्ण झालं!
“यानिमित्ताने माझं आणखी स्वप्न पूर्ण झालं. मी शाहरुख खानला भेटले.” असंही त्यांनी सर्वांना सांगितलं. यादरम्यान शाहरुख खानने छाया कदम यांना धीर दिला. मिठी मारून त्यांचं कौतुक केलं आणि ‘गॉड ब्लेस यू’ म्हणत त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय किंग खानने स्वत: छाया यांना मंचावरून खाली नेऊन सोडलं. याचे व्हिडीओ सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. मराठी कलाविश्वातील कलाकार सुद्धा छाया कदम यांचं भरभरून कौतुक करत आहेत.
दरम्यान, ७० फिल्मफेअर सोहळ्यात ‘लापता लेडीज’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ( Critics ), सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता, सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक अशा बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.