Abhinav Kashyap Talks About Salman Khan & Arbaaz Khan : ‘दबंग’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर यापूर्वी गंभीर आरोप केले आहेत. त्याने सांगितले की, सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच्या चित्रपटाच्या निर्मितीत हस्तक्षेप केला आणि त्याला श्रेयही दिले नाही. अशातच अभिनवने सलमानवर अजूनही काही आरोप केले आहेत.

अभिनवने ‘बॉलीवूड ठिकाणा’ला दिलेल्या मुलाखतीत सलमानबद्दल सांगितलं की, त्याने ‘दबंग’ चित्रपटाच्या एडिटरचं अपहरण केलं होतं. सलमानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनव म्हणाला, “सलमान दीड वाजता माझ्या खोलीत आला आणि त्याने पाहिलं की अरबाजचा एक महत्त्वाचा सीन आहे, ज्याची तो तयारी करत आहे; पण त्याने तो सीनच त्यातून काढून टाकला.”

ते एकमेकांचा तिरस्कार करतात – अभिनव कश्यप

सलमान खान व अरबाज खान यांच्यामधील नात्याबद्दल अभिनव म्हणाला, “ते एकमेकांचा तिरस्कार करतात. पण, मला माहीत नाही ते एकत्र कसे राहतात. त्यांचं कुटुंबही विचित्र आहे. माझ्यासमोर जरी ते भांडले नसले तरी अरबाजने याबद्दल त्याला नंतर विचारलं असेलच.” सलमान व अरबाज यांच्याबद्दल अभिनव पुढे म्हणाला, “एकदा माझ्यासमोर दोघांमध्ये भांडण झालेलं, त्यावेळी सलमान तेथील भांडी फेकत होता आणि अरबाजला मी तुझ्याबद्दल काही वाईट विचार केला नाही असं म्हणत होता. जेव्हा मी त्यांच्यातील भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सलमानने मला तू यात पडू नकोस असं सांगितलेलं.”

अभिनवने पुढे सलमानवर त्याने चित्रपटाच्या एडिटरचं अपहरण केल्याचा आरोप केला. तो म्हणाला, “सलमानने माझ्या एडिटरचं अपहरण केलं, एडिटिंग मशीनही घेतली आणि त्याला त्याच्या फार्महाऊसवर नेलं. सलमानने एकदा एडिटरला धमकीही दिली होती की जर दिग्दर्शकाने म्हणजेच मी काही केलं तर तो माझंही नुकसान करेल.”

अभिनवने सलमान व अरबाज यांना मलायका अरोराने त्यावेळी या चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम’ गाण्यात डान्स करू नये असं वाटतं होतं आणि तिच्या कपड्यांवरूनही सलमान आक्षेप घ्यायचा असंही म्हटलं आहे. अभिनवने खान कुटुंबाबद्दल त्यांच्या घरातील स्त्रियांनी अंगभर कपडे परिधान करावे असं त्यांना वाटतं आणि ते खूप रुढीवादी आहेत असंही म्हटलं आहे.