Deepika Padukone Kalki 2898 AD Exit : ‘ओम शांती ओम’, ‘जवान’, ‘पिकू’, ‘पठाण’, ‘पद्मावत’, ‘तमाशा’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या आणि अशा अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी दीपिका काही दिवसांपासून एका कारणाने चर्चेत आहे आणि ते कारण म्हणजे – अभिनेत्रीने ‘कल्की २८९८ ए.डी.’मधून घेतलेली एक्झिट.

संदीप रेड्डी वांगांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटानंतर आता दीपिकानं प्रभासच्या ‘कल्की २८९८ ए.डी.’मधूनही एक्झिट घेतली आहे. त्या बातमीनंतर दीपिकानं आपल्या नवीन चित्रपट ‘किंग’विषयी सोशल मीडियावर पोस्ट करीत सांगितलं की, ती शाहरुख खानबरोबर या चित्रपटाचं शूटिंग करीत आहे.

दरम्यान, CNN-News18 Showsha च्या वृत्तानुसार, दीपिकानं ‘कल्की २८९८ ए.डी.’च्या काही भागांचं शूटिंग आधीच पूर्ण केलं होतं. तिनं सुमारे २० दिवसांचं शूटिंग केलं असून, हे शूट पहिल्या भागाच्या शूटिंगदरम्यानच पार पडलं होतं.

चित्रपटाशी संबंधित एका सूत्रानं सांगितलं की, दीपिकानं आपल्या मानधनात २५% पेक्षा जास्त वाढ मागितली होती. “दीपिकाला माहीत होतं की, तिच्यासाठी भाग २ मध्ये एक सशक्त, अभिनयप्रधान भूमिका लिहिलेली आहे. त्यामुळे तिनं आधीच २० दिवसांचं शूटिंग पूर्ण केलं होतं. दिग्दर्शक नाग अश्विननं स्वतः अनेक मुलाखतींमध्ये हे स्पष्ट केलं होतं.” वृत्तांनुसार, पुढील शूटिंगचं वेळापत्रक परस्पर सहमतीनं ठरवायचं होतं. त्यामुळे डेट क्लॅशचं कारण चुकीचं आहे, असंही सांगण्यात आलं आहे.

‘कल्की २८९८ ए.डी.’मधून बाहेर पडल्यानंतर दीपिकानं लगेचच तिचा पुढचा प्रोजेक्टही जाहीर केला आहे. तिनं इन्स्टाग्रामवर शाहरुख खानबरोबरच्या ‘किंग’ या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात झाल्याची घोषणा केली.

दीपिका पादुकोण इन्स्टाग्राम पोस्ट

दीपिकानं शाहरुखचा हात हातात घेतलेला एक फोटो शेअर करीत असं म्हटलं, “१८ वर्षांपूर्वी ‘ओम शांती ओम’च्या सेटवर त्यानं मला एक गोष्ट शिकवली. चित्रपट यशस्वी होणं महत्त्वाचं असतंच; पण त्याहून जास्त महत्त्वाचं असतो तो अनुभव. हाच धडा मी आजपर्यंत पाळला आहे.”

दरम्यान, ‘किंग’ या चित्रपटात दीपिकासह शाहरुख खान आणि त्यांची मुलगी सुहाना खानसुद्धा दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.