Yograj Singh On Dharmendra’s cousin: अभिनेते आणि माजी क्रिकेटर योगराज सिंग हे लोकप्रिय क्रिकेटर युवराज सिंगचे वडील आहेत. योगराज सिंग हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा पश्चाताप असल्याचे मान्य केले.
याबरोबरच, योगराज सिंग यांनी एक्स पत्नी शबनम आणि मुलगा युवराज सिंग यांची माफीदेखील मागितली. आता आणखी एका मुलाखतीत केलेले त्यांचे वक्तव्य चर्चेत आहे. १९८० च्या अशांत काळात काम करण्याची संधी मिळालेले ते एकमेव पंजाबी अभिनेते होते. ते शीख बंडखोर जरनैल सिंह भिंडरावाले यांना भेटले. त्यांनी त्यांना संरक्षण दिले. त्या काळात पंजाबमधील कला क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य केले जात होते, असे योगराज सिंग यांनी वक्तव्य केले.
योगराज सिंग यांनी असा दावादेखील केला की, त्यांनी गायक अमर सिंग चमकिला यांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या गाण्यांमुळे ते निशाण्यावर होते. इतकेच नाही तर योगराज सिंग असेही म्हणाले की, धर्मेंद्र यांचा चुलत भाऊ अभिनेते वीरेंद्र यांना गोळी लागण्याच्या तीन दिवस आधी ते त्यांना भेटले होते.
“वीरेंद्र यांच्या …”
वीरेंद्र यांच्याबद्दल बोलायचे तर ते त्या काळातील सर्वात मोठे पंजाबी स्टार होते. १९८८ मध्ये मेहसमपूर गावात एका कार्यक्रमापूर्वी अमर सिंग चमकिला आणि त्यांची पत्नी अमरजोत यांची हत्या झाल्यानंतर काही महिन्यांनीच त्यांचा मृत्यू झाला. वीरेंद्र यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पटोला’ हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. या चित्रपटात अमर सिंग चमकिला आणि त्यांची पत्नी अमरजोत यांनी एका गाण्यातून कॅमिओ केला होता.
योगराज सिंग यांनी नुकतीच अनटोल्ड पंजाबला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी काही आठवणी सांगितल्या .जरनैल सिंह भिंडरावाले, वीरेंद्र व अमर सिंग चमकिला यांच्याबरोबर झालेल्या संवादाबाबत त्यांनी सांगितले. जरनैल सिंह भिंडरावाले यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल योगराज सिंग म्हणाले, “मी त्यांना भेटायला गेलो होतो, ते खूप मृदूभाषी होते. त्यांनी मला एक मोठा ग्लास दूध दिले होते, त्यानंतर त्यांची माणसे माझ्या सरंक्षणासाठी सेटवर येत असत.”
“माझ्याभोवती २०-२५ सशस्त्र पुरुष असत. मी सुरक्षित होतो. मला कोणीही हात लावू शकत नव्हते. पंजाबी चित्रपटसृष्टीतील मी एकमेव अभिनेता होतो, ज्याला काम करण्याची परवानगी होती. वीरेंद्र यांच्या हत्येच्या तीन दिवस आधी मी त्यांना भेटलो होतो. तुमचं शूटिंग पुढे ढकला, असे मी त्यांना सांगितले होते.”
“तो चित्रपटातील सीन…
चमकिला यांची गाणी माझ्या एका चित्रपटात होती. ती मला आवडली नव्हती. चमकिला यांच्याबरोबर काम करू नका, अशी मला धमकी मिळाली होती. मी चमकिला यांना काळजी घ्या, असे सांगितले होते. त्यावर चमकिला म्हणालेले, “कोणाला मला का मारायचे असेल?” त्यावर मी त्यांना म्हणालो की, कोण मारेल हा प्रश्न नाही, तर संस्कृतीचे पावित्र्य जपण्याचा प्रश्न आहे.”
अमर सिंग चमकिला यांचे सचिव मानकू यांनी सिने पंजाबीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी चमकिला यांच्या हत्येबाबत सांगितले होते. ते म्हणालेले, “गोळीबार करणारे गर्दीत होते. ते वाटेत त्यांना गोळी घालू शकले असते. स्टेजवर आल्यानंतर ते त्यांना गोळी घालू शकले असते. कोणास ठाऊक, जर त्यांनी स्टेजवर गोळीबार केला असता तर मलाही गोळी लागली असती, पण ते वाट पाहात होते. चमकिला त्यांच्या गाडीतून आले. मी म्हणालो की चमकिला यांनी हजेरी लावली आहे, टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. मी हे म्हणत आहे, तितक्यात मला मोठा आवाज ऐकू आला. तो चित्रपटातील सीन वाटत होता.”
चमकिला यांचे गीतकार स्वरण सिविया यांनी आरपीडी २४ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. ते या मुलाखतीत म्हणालेले की त्यांना विविध गटांकडून धमक्या दिल्या जात होत्या. धमकीची पत्रे मिळाल्यानंतर चमकिला जरनैल सिंह भिंडरावाले यांना भेटायलाही गेले होते. त्यांनी चमकिला यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. तुम्ही चांगली गाणी गा, ते तुम्हाला धमकावणार नाहीत असे ते म्हणाले होते.
