आपल्या हटके विषय आणि मांडणीसाठी प्रसिद्ध असलेल्या बॉलिवूडमधील काही मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे इम्तियाज अली. वेगवेगळ्या चित्रपटांमधून जीवनाचं सार सांगणाऱ्या इम्तियाजचे चित्रपट हे तरुणांसाठी कायम प्रेरणा देणारे असतात अन् त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून तो फार गंभीर विषयांवर फार सहजतेने भाष्यही करतो. इम्तियाजने दिग्दर्शित केलेला ‘जब वी मेट’ हा चित्रपट कल्ट चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटात करीना कपूर खानने गीत या एका तरुणीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट आणि करीनाने साकारलेली गीत आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.

इम्तियाज अलीने करीना कपूरशिवाय दीपिका पदूकोणबरोबरही चांगले सुपरहीट चित्रपट दिले. इम्तियाज आणि दीपिका ही जोडी सर्वप्रथम ‘कॉकटेल’ या चित्रपटातून समोर आली, अन् या चित्रपटातीलही दीपिकाचं वेरॉनिका हे पात्र प्रेक्षकांना भावलं. यानंतर त्यांनी ‘तमाशा’ या चित्रपटात एकत्र काम केलं. करीना कपूर व दीपिका पदूकोण यापैकी सर्वोत्तम अभिनेत्री कोण याबद्दल नुकतंच इम्तियाज अलीने भाष्य केलं आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना इम्तियाजने करीना कपूरचं नाव घेतलं.

आणखी वाचा : नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान ‘जब वी मेट’ची करीना की ‘कॉकटेल’मधील दीपिका पदूकोण या दोघींमध्ये निवडताना इम्तियाजने करीनाचं नाव निवडलं. वास्तविक पाहता ‘कॉकटेल’चे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले होते तर याची पटकथा इम्तियाज अलीने लिहिली होती अन् त्यामुळेच त्याने करीनाचे नाव घेतले. या दोन्ही भूमिकांमध्ये निवडताना इम्तियाज म्हणाला, “या प्रश्नाचं उत्तर देणं फार कठीण आहे, पण मी करीनाचं नाव घेईन. कारण ‘जब वी मेट’चं दिग्दर्शन मी केलं आहे.”

या चित्रपटाचं दिग्दर्शन इम्तियाजने स्वतः केलं असल्याने त्याने करीनाचं नाव घेतल्याचं त्याने मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं. ‘जब वी मेट’मुळे करीनाच्या प्रसिद्धीमध्ये आणखी भर पडली. ‘जाने जान’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, गीत आणि पू यांसारख्या पात्रांमुळे बहुतेक लोक तिला ओळखतात, असे करीनाने नमूद केले होते. ‘जब वी मेट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला पण त्यानंतर अद्याप करीना आणि इम्तियाज या दोघांनी पुन्हा एकत्र काम केले नाही.