बॉलीवूडची लाडकी अभिनेत्री ‘देसी गर्ल’ म्हणजेच प्रियांका चोप्रा होय. आज प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) आपल्या अभिनय क्षेत्रातील मेहनतीने आणि एकापेक्षा एक भूमिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकत एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मात्र, बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर प्रियांका चोप्रा कशी होती, यावर दिग्दर्शक गुड्डू धनोआ यांनी वक्तव्य केले आहे.

“प्रियांकाच्या खूप तक्रारी आल्या”

नुकत्याच ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक गुड्डू धनोआ यांनी सांगितले की, ‘बिग ब्रदर’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत होते आणि त्यांनी निर्माता म्हणूनदेखील काम केले होते. २००२-०३ ची गोष्ट आहे. प्रियांकाला अभिनयाबद्दल फारशी माहिती नव्हती, मात्र तिला ते सर्व शिकायचे होते. हा शॉट कसा करू किंवा केला पाहिजे हे मला समजावून सांगा असे ती म्हणायची. तिला गोष्टी शिकायच्या होत्या. उत्तम अभिनय करण्याची भूक तिच्यात होती. हैदराबादमधील शूटिंग व्यवस्थित पार पडले. मात्र, १५-२० दिवस शूटिंग झाल्यानंतर आम्हाला मुंबईमधून प्रियांकाविषयी तक्रारी येऊ लागल्या. ती वाईट अभिनेत्री असल्याचे म्हटले जाऊ लागले आणि या तक्रारींचे प्रमाण खूप होते. मी आणि सनी देओलने ते काम पाहिले. त्यानंतर आम्ही दोघांनी या मुलीसोबत काम करू आणि या मुलीसोबतच चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. सनी देओलने तिच्यावर विश्वास दाखवला. तिचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला होता. ती हळूहळू गोष्टी शिकेल हे आम्हाला माहीत होते. आज ती खूप पुढे गेली आहे.

हेही वाचा: सकारात्मक राहिलं की गोष्टी सकारात्मक होतीलच असं नाही; अर्जुन कपूरचा रोख मलायकावर?

ते पुढे म्हणतात की, ज्यावेळी प्रियांकाने मुंबईत रिसेप्शनसाठी बोलावले होते, त्यावेळी मी भावूक झालो होतो. तिने खूप कमी काळात अनेक गोष्टी शिकल्या आहेत. प्रियांका चोप्राने विलक्षण प्रगती केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रियांका चोप्रा हे नाव फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्येदेखील प्रसिद्ध आहे. नुकतीच ती अनंत-राधिकाच्या लग्नासाठी भारतात आली होती. याबरोबरच सोशल मीडियावर तिने तिच्या वाढदिवसाचे काही फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. २०१८ मध्ये तिने अमेरिकन गायक निक जोनासबरोबर लग्नगाठ बांधली असून त्यांना मालती मेरी नावाची मुलगीदेखील आहे. अभिनेत्री अनेकदा तिच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.