अभिनेत्री दिशा पाटनी ‘योद्धा’या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या ॲक्शन चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये निर्माता करण जोहर, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री राशी खन्ना आणि दिशा पाटनी यांच्यासह ‘योद्धा’ च्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दिशाने,जेव्हा ती मॉडेलिंग करत होती तेव्हा करणने तिला पाहिलं आणि अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी दिली, असा खुलासा केला.

दिशा पाटनी म्हणाली, “मी आज अभिनेत्री आहे ती फक्त करण जोहरमुळे. कारण तोच होता ज्याने मला मॉडेलिंग करताना पाहिलं होतं आणि तेव्हा मी केवळ १८ वर्षांची होते. मला अजूनही असं वाटत जर करणने तेव्हा मला पाहिलं नसत तर मी आज या क्षेत्रात नसते. लोक करणबद्दल जे काही बोलतात त्याचा मला फरक पडत नाही. मी या इंडस्ट्रीमधली नाही म्हणून मला असं वाटतं की ही संधी मला करणमुळेच मिळाली आहे.”

दिशाच्या या विधानानंतर, करण तिला ‘आय लव्ह यू’ म्हणाला. या संभाषणात सिद्धार्थनेही भाग घेतला आणि त्यानेही करणचं कौतुक केलं. “असली हिरे की पेहेचान ‘जोहर’ को ही है,” असं सिद्धार्थ म्हणाला.

हेही वाचा… लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी पोहोचले अमृतसरला; सुवर्ण मंदिराजवळील फोटो केले शेअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दिशाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून दिशाने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यासाठी तिला आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीचा (IIFA) पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर दिशा ‘बागी २’, ‘मलंग’, ‘एक विलन रिटर्न्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. आता ‘योद्धा’या आगामी चित्रपटात दिशा झळकणार आहे. हा चित्रपट १५ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.