Emiway Bantai Receives ₹1 Crore Extortion And Death Threat: गायक बिलाल शेख ऊर्फ एमीवे बंटायला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बंटाय म्युझिक कंपनीच्या मोबाइलवर मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. तसेच २४ तासांत त्याला एक कोटी रुपये देण्यासाठी धमकावले आहे.
गँगस्टर गोल्डी ब्रारकडून एमीवे बंटायला जीवे मारण्याची धमकी
बंटाय म्युझिक कंपनीने नुकतेच सिद्धू मुसेवालाला समर्पित गाणे प्रदर्शित केले आहे. त्यानंतर लगेचच बंटाय म्युझिक कंपनीच्या मोबाइलवर धमकी देणारा मेसेज देण्यात आला आहे. या मेसेजमध्ये लिहिले आहे, “मी गँगस्टर गोल्डी ब्रार आहे. तुझ्या गायकाकडे २४ तास आहेत. एक कोटी रुपये पाहिजेत, नाहीतर मारून टाकेन.” याच मेसेजमध्ये पुढे लिहिले आहे, “गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई ग्रुप, गँगस्टर लॉन ग्रुप, गँगस्टर रोहित गोदरा.”
धमकीच्या मेसेजमध्ये गोल्डी ब्रार असे ज्या व्यक्तीचे नाव आहे, तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी म्हणून ओळखला जातो. २०२२ मध्ये सिद्धू मुसेवालाची हत्या झाली होती, त्यामध्येदेखील त्याचा संबंध असल्याचे म्हटले जाते. ‘ट्रिब्यूट टु सिद्धू मुसेवाला’ हे गाणे प्रदर्शित केल्यानंतर धमकी आली आहे, याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
एनआरआय कोस्टल पोलिस ठाण्यामधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. ज्या नंबरवरून संदेश पाठवला गेला होता तो शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. याबरोबरच, गुन्हे शाखेनेदेखील या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, सलमान खानलादेखील लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अनेकदा धमक्या आल्याचे समोर आले आहे, त्यामुळे सलमान खान मोठ्या सुरक्षेसह घराबाहेर पडतो. २०२२ मध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची तब्बल ३० गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. या हत्याकांडामागे बिश्नोई गँग असल्याचेही समोर आले होते.