Amitabh Bachchan gets emotional: बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन अशी ओळख आहे. चित्रपटात अन्यायाविरुद्ध लढणारा, गोरगरीब, पीडितांना न्याय मिळवून देणारा, सरकारविरुद्ध लढणारा अशा भूमिका त्यांनी अनेक चित्रपटांत साकारल्या.

गेल्या अनेक वर्षांत अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. संपूर्ण जगभरात त्यांचे चाहते आहेत. अमिताभ बच्चनदेखील त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. सोशल मीडियावर ब्लॉगद्वारे ते अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. तसेच, दर रविवारी ते त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटतात.

देशभरातून अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते जलसाबाहेर गर्दी करतात. १९८० च्या दशकापासून अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर दर रविवारी चाहते गर्दी करतात. तेव्हापासून ही परंपरा कायम आहे. बिग बी अनेकदा सोशल मीडियावर हे फोटो शेअर करतात.

अमिताभ बच्चन म्हणाले…

नुकताच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत असताना त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. इतके प्रेम पाहून मी निःशब्द झालो आहे असे त्यांनी लिहिले.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये चाहते त्यांच्या बंगल्याबाहेर त्यांचे नाव घेऊन ओरडत असल्याचे दिसत आहेत. चाहत्यांचे हे प्रेम पाहून माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही असे त्यांनी लिहिले. तसेच अमिताभ बच्चन असेही म्हणाले की, लोकांच्या प्रेमाला मी विसरू शकत नाही, त्यांचे खूप आभार. चाहत्यांच्या प्रेमाशी कशाचीही तुलना होऊ शकत नाही. त्यांचे आशीर्वाद कायमच माझ्याबरोबर राहतील. मला कायमच आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक रविवारी माझ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक चाहत्याप्रती माझ्या मनात प्रेम आहे.

अमिताभ बच्चन हे जुहू येथील जलसा या बंगल्यात राहतात. मुंबईत त्यांच्या इतर ठिकाणीदेखील मालमत्ता आहेत. त्यांचा प्रतीक्षा हा बंगलादेखील आहे.

https://www.tumblr.com/srbachchan/793600244089749505/day-6410

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर ते सध्या कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. या मंचावर बिग बी स्पर्धकांशी संवाद साधताना त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतात. त्यांना आलेले अनुभव, शूटिंगदरम्यानच्या गमतीजमतीदेखील सांगतात.

दरम्यान, अमिताभ बच्चन आजही चित्रपटात वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतात. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या दीपिका पदुकोण व प्रभास यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कल्की: २८९८ एडी’ या चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक झाले होते.