भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर चरित्रपट येणार आहे. बॉलीवूड अभिनेता आमिर खान व प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राजकुमार हिरानी हा चरित्रपट बनवणार आहेत, तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक एस. एस. राजामौलीदेखील दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट बनवणर आहेत. २०२३ मध्ये त्यांनी ‘मेड इन इंडिया’ या त्यांच्या सिनेमाची घोषणा केली होती, यामध्ये दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत अभिनेता ज्युनियर एनटीआर झळकणार आहे.
अशातच आता दादासाहेब फाळकेंचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसाळकर यांनी नुकतीच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर पुसाळकर यांनी ‘अमर उजाला’ला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी “राजामौली यांनी आम्हाला ते सिनेमा करत आहेत यासाठी एकदाही विचारात घेतलं नाही, आमच्याशी संपर्कही केला नाही” असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी आमिर खानची टीम याकरता त्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
‘अमर उजाला’ला दिलेल्या मुलखतीत चंद्रशेखर पुसाळकर म्हणाले, “मी राजामौलींच्या प्रोजेक्टबद्दल ऐकून आहे, पण त्यांच्यापैकी कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. जर दादासाहेब फाळके यांच्यावर कोणी चित्रपट बनवत असेल तर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना विचारायला हवं. त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, कारण त्यांची खरी कहाणी आम्हालाच माहिती आहे.”
पुढे ते म्हणाले, “आमिर खानची टीम गेली तीन वर्ष या प्रोजेक्टसाठी माझ्या संपर्कात आहे. त्यांनी जेव्हा याबाबत मला सांगितलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं आणि मलाही आताच समजलं की आमिर खान व राजकुमार हिरानी हे दोघे एकत्र काम करत आहेत. पण, त्यांच्या टीममधील हिंदुकुश भारद्वाज, हे गेल्या तीन वर्षांपासून माझ्या संपर्कात आहेत. ते रिसर्चदरम्यान मला वारंवार भेटण्यासाठी यायचे, तेव्हा मी त्यांना तुम्ही खूप खरेपणाने काम करत आहात, त्यामुळे माझा यावर काही आक्षेप नाही असं म्हटलं.”
या मुलाखतीदरम्यान, चंद्रशेखर यांनी आमिर खानच्या या चित्रपटामध्ये त्यांच्या आजी सरस्वती फाळके यांची भूमिका अभिनेत्री विद्या बालनने साकारावी असं मत व्यक्त केलं. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच या प्रोजेक्टचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून आमिर खान ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेसाठी तयारी करणार असल्याचं म्हटलं गेलं.