Fatima Sana Shaikh On Casting Couch : मनोरंजन विश्वात आजवर अनेक कास्टिंग काऊचच्या घटना घडल्या आहेत. सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण करत असताना कलाकारांना विशेषत: अभिनेत्रींना अनेक अडचणींतून जावं लागतं. यापैकी एक म्हणजे कास्टिंग काऊच. आजवर अनेक अभिनेत्री कास्टिंग काऊचच्या बळी ठरल्या आहेत. अशा घटनांबद्दल पूर्वी अभिनेत्री भाष्य करत नसत, पण आता मात्र त्या स्वत: पुढे येऊन याबद्दल उघडपणे सांगतात.

या वर्षाच्या सुरुवातीला बॉलीवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने तिच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं होतं. दक्षिण सिनेसृष्टीत एका कास्टिंग एजंटकडून वाईट अनुभव आल्याचं फतिमाने सांगितलं होतं. या घटनेसंदर्भात आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं तिने नुकत्याच एका मुलाखतीत म्हटलं आहे. न्यूज १८ शी बोलताना तिने या घटनेबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

यावेळी फातिमा म्हणाली, “मला हे सगळं स्पष्ट करायचं आहे. संपूर्ण दक्षिण चित्रपटसृष्टी अशी नाही. ती फक्त एक विशिष्ट घटना घडली होती. मी त्या प्रसंगाबद्दल बोलले आणि ती घटना अचानक मोठी बनली, ज्याची आवश्यकता नव्हती. दुर्दैवाने असे अनुभव अनेक क्षेत्रांमध्ये सामान्य आहेत. हे प्रत्येक क्षेत्रात आहे. प्रत्येक महिला यातून जात असते. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला.”

प्रत्येकाला अशा घटनांचा सामना करावा लागतो : फातिमा सना शेख

यानंतर फातिमा म्हणाली, “प्रत्येकाला अशा काही घटनांचा सामना करावा लागतो. मी ज्या व्यक्तीबद्दल बोलले होते, तो दक्षिण चित्रपट क्षेत्रातला एक छोटा निर्माता किंवा कास्टिंग एजंट होता. ते संपूर्ण दक्षिण चित्रपट क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत नाहीत.” दरम्यान, फातिमाने सांगितल्यानुसार एका कास्टिंग एजंटकडून तिला “तू सर्व काही करण्यासाठी तयार आहेस ना?” असा प्रश्न विचारण्यात आला होता.

कास्टिंग एजंटच्या या प्रश्नाचं उत्तर देत फातिमा म्हणाली होती, “मी प्रचंड मेहनत करेन आणि चित्रपटातील भूमिकेसाठी जे काही गरजेचं असेल ते सर्व काही करण्यासाठी मी तयार आहे. त्याला काय म्हणायचं आहे मला कळत होतं, पण मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मलादेखील पाहायचं होतं, तो किती खालच्या पातळीला जात आहे. इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मी अनेक वाईट गोष्टी ऐकल्या. सेलिब्रिटींना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फातिमा सना शेखच्या कामाबद्दल थोडक्यात माहिती

दरम्यान, फातिमाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. ‘दंगल’नंतर फतिमाने ‘लूडो’, ‘अजीब दास्तान’ आणि ‘सॅम बहादूर’मध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. फतिमा सना शेख लवकरच अनुराग बसूच्या रोमँटिक ड्रामा ‘मेट्रो…इन डिनो’मध्ये आहे. तसंच लवकरच ती विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह आणि शरीब हाश्मी यांच्याबरोबर ‘गुस्ताख इश्क’मध्येही दिसणार आहे.