Abhishek Bachchan Firts Filmfare Awards : बॉलीवूडमधील सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक असलेला पुरस्कार सोहळा म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार २०२५ सोहळा गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडला आहे. ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात अभिनेता अभिषेक बच्चनला ‘I Want To Talk’साठी पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
वडील अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी त्याला या पुरस्कारामार्फत खास गिफ्ट मिळालं असल्याची भावना त्यानं यावेळी व्यक्त केली. २०२४ मध्ये आलेल्या ‘I Want To Talk’ या चित्रपटासाठी त्याला ७० व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. अभिषेकसह कार्तिक आर्यनला हा पुरस्कार विभागून देण्यात आला. ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटासाठी कार्तिकला हा पुरस्कार मिळाला.
पुरस्कार स्वीकारताना अभिषेक अत्यंत भावुक झाला होता. आपल्या भावना व्यक्त करताना अभिषेक म्हणाला, “इंडस्ट्रीत येऊन मला २५ वर्षं पूर्ण झाली. मी किती वेळा या पुरस्कारासाठी भाषणाची तयारी केली होती, तेच लक्षात नाही. आज हे स्वप्न पूर्ण झालं आहे. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. कुटुंबीयांसमवेत मला हा पुरस्कार मिळणं, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.”
पुढे तो म्हणाला, “माझ्या सर्व दिग्दर्शक, निर्माते आणि सहकलाकारांचे आभार. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला नवीन संधी दिल्या. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता; पण त्या सगळ्या प्रवासाचं फळ आज मला मिळालं आहे, असं वाटतं. हा पुरस्कार म्हणजे २५ वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या.”
पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळताच अभिषेकने व्यक्त केल्या भावना
त्यानंतर अभिषेक म्हणतो, “ऐश्वर्या आणि आराध्या, मला माझी स्वप्नं पूर्ण करू दिल्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. या पुरस्कारामागे तुमचा खूप मोठा त्याग आहे. हा पुरस्कार मी खास व्यक्तींना अर्पण करतो आणि त्या व्यक्ती म्हणजे माझे वडील व माझी मुलगी.” दरम्यान, अभिषेकच्या आयुष्यातील या खास प्रसंगी मात्र ऐश्वर्या आणि आराध्या दोघी गैरहजर होत्या.