FIR Filed Against Sanjay Leela Bhansali : संजय लीला भन्साळी सध्या त्यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. असं असताना मात्र संजय लीला भन्साळींविरोधात तक्रार दाखल झाल्याची बातमी समोर आली आहे.
‘लव्ह अँड वॉर’ या आगामी चित्रपटाचं सध्या चित्रीकरण सुरू आहे. परंतु, चित्रीकरणादरम्यान घडलेल्या प्रकारामुळे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय यांच्या विरोधात गैरवर्तन व फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
संजय लीला भन्साळी यांच्याविरोधात तक्रार दाखल का करण्यात आली?
‘द न्यूज मिनट’च्या (The News Minute) वृत्तानुसार माथूर नावाच्या व्यक्तीने आरोप केला की, त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्व आवश्यक तयारी केली होती, ज्यामध्ये कलाकारांसाठी सुरक्षेची व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार सरकारी विभागांशी समन्वय साधणे यांचा समावेश होता. वारंवार विनंती करूनही भन्साळी प्रोडक्शन्सकडून माथूर यांच्याबरोबर कोणताही अधिकृत करार करण्यात आलेला नाही. मात्र, त्यांना ‘लव्ह अॅण्ड वॉर’ या चित्रपटासाठी लाईन प्रोड्यूसर म्हणून त्यांची भूमिका निश्चित करणारा एक ईमेल मिळाला होता.
माथूर १७ ऑगस्ट रोजी नरेंद्र भवन, बीकानेर येथे चित्रपटाच्या टीमला भेटायला गेले असताना, भन्साळी आणि भन्साळी प्रोडक्शन्सचे व्यवस्थापक उत्कर्ष बाली आणि अरविंद गिल यांनी त्यांच्याशी उद्धटपणे वागल्याचा आरोप माथूर यांनी केला आहे. माथूर यांनी आरोप केला की त्यांना ढकलण्यात आले, अपमान करण्यात आला आणि त्यांच्या कंपनीचे आगामी प्रॉजेक्ट धोक्यात येतील अशी धमकीही देण्यात आली. सुरुवातीला पोलिसांत तक्रार दाखल केली नव्हती, मात्र माथूर यांनी न्यायालयाचा दार ठोठावल्यानंतर पोलिसांना तक्रार नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस या प्रकरणासंदर्भात तपास करत आहेत.
संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर या चित्रपटाचं सध्या चित्रीकरण सुरू असून २०२६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामधून अनेक वर्षांनंतर रणबीर कपूर संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करणार आहे. त्याने ‘सावरिया’ या त्याच्या पदार्पणातील चित्रपटात संजय लीला भन्साळींसह काम केलं होतं. तर यामधून तो पुन्हा एकदा त्याची बायको अभिनेत्री आलिया भट्टसह झळकणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट व विकी कौशल या चित्रपटामार्फत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.