FIR Filed Against Shah Rukh Khan & Deepika Padukone : शाहरुख खान व दीपिका पादुकोण हे दोघे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटींमध्ये गणले जातात. दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. परंतु, सध्या ते दोघेही अडचणीत सापडले आहेत. त्याचं कारण म्हणजे दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सिनेमा, मालिकांव्यतिरिक्त कलाकार वेगवेगळ्या जाहिरातींमध्येही झळकतात; परंतु काही वेळा या जाहिराती कलाकारांसाठी अडचणीची बाब ठरतात. काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज व विजय देवरकोंडा यांना एका अॅपसंबंधित जाहिरातीमुळे ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. अशातच आता दीपिका व शाहरुख यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शाहरुख खान व दीपिका पादुकोणविरोधात कोणी केली तक्रार?
‘भास्कर इंग्लिश’च्या वृत्तानुसार शाहरुख खान व दीपिका पादुकोण आणि ‘ह्युंदाई’च्या इतर सहा जणांविरोधात एका फसवणुकीच्या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आल आहे. या प्रकरणात वाहन उत्पादनामध्ये दोष असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ही तक्रार कीर्ती सिंग यांनी दाखल केली आहे, जे राजस्थानमधील भरतपूर येथील रहिवासी आहेत.
कीर्ती सिंग यांनी २०२२ रोजी ह्युंदाई कंपनीची गाडी २३ लाख ९७ हजार रुपयांना खरेदी केली होती. परंतु, खरेदीनंतर त्या गाडीत काही तांत्रिक बिघाड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ही गाडी हरयाणा येथून खरेदी केली होती. गाडी खरेदी केल्यानंतर ६-७ महिन्यांनी त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याचे समजल्यानंतर त्यांनी कंपनीच्या मॅनेजमेंट टीमकडे या संदर्भात तक्रार दाखल केली; परंतु त्यांना गाडीचं मॉडेल खराब आहे आणि त्यामुळे त्याबाबत काहीही होऊ शकत नाही, असं सांगितलं.
कीर्ती सिंग आधी भरतपूर येथील सीजेएम कोर्ट नंबर २ येथे तक्रार दाखल करण्यास गेले होते; परंतु तिथे त्यांना मधुरा गेट पोलिस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार करण्यास सांगितलं गेलं. त्यानुसार तिथे तक्रार नोंदविल्यावर आता मधुरा गेट पोलिस ठाण्याने या संदर्भात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
शाहरुख खान या कंपनीबरोबर १९९८ पासून काम करीत आहे. तर, दीपिका पादुकोण २०२३ साली या कंपनीची ब्रँड अॅम्बेसॅडर बनली होती. दोघांनी २०२४ मध्ये या संदर्भात एकत्रित जाहिरात केली होती. अशातच आता सर्वोच न्यायालयानं हे दोघेसुद्धा चुकीची जाहिरात करण्यासंदर्भात तितकेच जबाबदार असतील, असा आदेश दिला आहे. दीपिका किंवा शाहरुख दोघांनीही अद्याप या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.