बॉलीवूडमधील लोकप्रिय गायक, संगीतकार सचिन संघवी याच्याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. एका तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर सचिनला अटकदेखील करण्यात आली होती, पण आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सचिनविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९, ७४ आणि ८९ अंतर्गत फसवणूक, अत्याचार आणि संमतीशिवाय गर्भपात केल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. आता हे प्रकरण सांताक्रूझ पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
सचिन संघवीला २२ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. एफआयआरमधील माहितीनुसार, विले पार्ले पूर्व येथील २९ वर्षीय तरुणी गायिका आहे. या पीडितेची फेब्रुवारी २०२४ मध्ये इन्स्टाग्रामवर सचिन संघवीशी ओळख झाली. सचिनने तिच्या आवाजाचं कौतुक केलं आणि तिला त्याच्या रंग अल्बममध्ये काम ऑफर केलं. दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले आणि ते कामाबद्दल बोलू लागले. सचिनने तिला त्याच्या सांताक्रूझ वेस्ट येथील स्टुडिओमध्ये बोलावलं. तिथे ते नियमित भेटायचे. सचिनने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन पीडितेशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं. वैवाहिक आयुष्यात अडचणी आहेत, असा दावा तो करायचा.
एप्रिल २०२४ मध्ये, त्याने सांताक्रूझच्या दुसऱ्या स्टुडिओमध्ये शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप पीडितेने केला. त्याने लग्नाचं आमिष दाखवलं. २८ मे २०२४ रोजी, सचिनचे कुटुंबीय विदेशात असताना, त्याने त्याच्या घरी तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. १५ जून ते २० जून २०२४ दरम्यान विदेशात बुडापेस्ट आणि इतर काही ठिकाणी फिरायला गेल्यावर आणि नंतर विले पार्ले पूर्व येथे स्टुडिओमध्ये आणि कारमध्ये त्यांनी संबंध ठेवले.
पीडितेला १९ जुलै २०२५ रोजी सचिनच्या फोनमध्ये दुसऱ्या महिलेबरोबरचे काही फोटो आणि चॅट्स आढळले. यानंतर दोघांमध्ये वाद झाले. दोघे कामानिमित्त दुबईला गेले होते, तिथे त्याने तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले. ४ ऑगस्ट २०२५ रोजी पीडितेला समजलं की ती गरोदर आहे. नंतर सचिन संघवी सांताक्रूझच्या एका कॅफेमध्ये तिला भेटला आणि तिच्यावर गर्भपातासाठी दबाव आणला. त्याने पीडितेचे फोटो आणि व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली. मग पीडितेचा गर्भपात करण्यात आला. गर्भपातानंतर, सचिन संघवीने तिला ब्लॉक केलं, यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिला उपचार घ्यावे लागले.
१० ऑक्टोबर २०२५ रोजी पीडिता व सचिन संघवी एका क्लिनिकमध्ये भेटले. तिथे त्याने तिला ‘त्रास देऊ नकोस’ असं सांगितलं आणि पुन्हा भेटण्यास नकार दिला, असं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
