Bollywood’s 5 Songs Featuring Kabootar : सलमान खानच्या ‘मैंने प्यार किया’पासून ते अभिषेक बच्चनच्या ‘देल्ली ६’ पर्यंत हे आहेत बॉलीवूडचे असे पाच चित्रपट, ज्यांमधील कबुतरांवर आधारित गाणी खूप गाजली होती. पूर्वीच्या काळी दोन प्रेम करणाऱ्या लोकांमधील दुवा म्हणजे कबूतर असे असं म्हटलं जायचं. कबूतर चिठ्ठी पोहचवण्याचं काम करत असल्याचं आपण अनेकदा ऐकलेलं, पाहिलेलं असतं. पूर्वीच्या बॉलीवूडमधील चित्रपटातही असं पाहायला मिळतं.
बॉलीवूड नेहमीच भव्य सेट्स, सुंदर नृत्य आणि लक्षात राहणाऱ्या गाण्यांसाठी ओळखले जाते. अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये गाणी अधिक आकर्षक वाटावीत म्हणून प्राण्यांचा उपयोग केला जातो किंवा कथा सांगताना त्यांचा वापर केला जातो. बॉलीवूड गाण्यांमध्ये दिसणाऱ्या प्राण्यांपैकी एक म्हणजे कबूतर. प्रेम आणि शांततेचे प्रतीक, तसेच पत्रे किंवा संदेश पोचवणारे म्हणून कबूतर ओळखले जातात. बॉलीवूडनेही गाण्यांमध्ये त्यांच्या वापरातून वेगळीच छाप पाडली आहे. त्यामुळे जाणून घेऊयात बॉलीवूडमधील अशा पाच गाण्यांबद्दल, ज्यामध्ये कबुतरांना दाखवले आहे.
‘कबूतर जा जा’ – चित्रपट (मैंने प्यार किया)
जेव्हा कधी कबुतरांबद्दल बोललं जातं तेव्हा सलमान खान व भाग्यश्री यांच्या ‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील कबूतर जा जा हे गाणं पहिलं आठवतं. ९०च्या काळातील हे गाजलेल्या गाण्यांपैकी एक. सलमान खान व भाग्यश्री यांची यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्याकाळी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यामध्ये पांढऱ्या कबुतराचा वापर विरह आणि आठवणींचं प्रतीक म्हणून केल्याचं पाहायला मिळतं. तसेच यामध्ये कबूतर प्रेमपत्र पोहोचवतानाही दिसतं.
‘मसक्कली’ – चित्रपट (Delhi -6)
‘मसक्कली’ हे गाणं अभिषेक बच्चनच्या (Delhi-6) या चित्रपटातील आहे. यामध्ये अभिषेक बच्चन व सोनम कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या गाण्यात कबुतरांचा उपयोग स्वातंत्र्य आणि प्रेम यांचे प्रतीक म्हणून केला आहे. गाण्याच्या ओळींमध्ये मसकक्ली आणि रंगरेज नावाच्या दोन प्रेमात असलेल्या कबुतरांची कथा सांगितली आहे, जी एकत्र मोकळ्या आकाशात उडण्याची स्वप्नं पाहतात. गाण्याच्या व्हिडीओतही पार्श्वभूमीत उडणारी कबुतरे दाखवली आहेत.
‘गुटूर गुटूर’ – चित्रपट (दलाल)
१९९३ मध्ये आलेल्या ‘दलाल’ या चित्रपटातील ‘गुटूर गुटूर’ हे गाजलेलं गाणं आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि आयेशा झुल्का होते, त्याकाळी हे गाणं खूप गाजलं होतं. यातील उत्तम संगीताला सुंदर ओळींची जोड मिळाली आहे.
‘छत के उपर दो कबूतर’ – चित्रपट (दिल ही तो हैं)
१९९२ साली आलेल्या ‘दिल ही तो है’ या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील ‘छत के उपर दो कबूतर’ हे गाणं त्यांच्या लक्षवेधी अभिनयामुळे आजही लक्षात राहिलं आहे. गाण्याचा कोरस खूपच आकर्षक आहे आणि या गाण्याला अर्थ देणारे दोन कबूतरही विशेष कौतुकास पात्र ठरतात.
‘पिजन कबूतर’ – चित्रपट (दिवाने हुए पागल)
२००५ मध्ये आलेल्या ‘दिवाने हुए पागल’ या चित्रपटातील ‘पिजन कबूतर’ या गाण्यात अक्षय कुमार आणि रिमी सेन झळकले होते. या गाण्यात अक्षय कुमार कबुतरांना दाणे खाऊ घालताना दिसतो आणि कबूतर हे गाण्याच्या नृत्यरचनेचा (कोरिओग्राफीचा) भाग बनतात.