Riteish Deshmukh’s Romantic Birthday Post For Wife Genelia : आपल्या सहज-सुंदर अभिनयाने सर्वांना भुरळ घालणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून जिनिलीया देशमुखला ओळखलं जातं. आज अभिनेत्री तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून जिनिलीयाने हिंदी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. तिने या चित्रपटात पहिल्यांदाच रितेशबरोबर स्क्रीन शेअर केली होती.

‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली अन् पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन रितेश-जिनिलीयाने लग्नगाठ बांधली. आज लाडक्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त खास रोमँटिक पोस्ट शेअर करत रितेशने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश लिहितो, “माझी बायको, माय लव्ह…तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आज फक्त तुझा वाढदिवस नाहीये, तर हा दिवस मला कायम आठवण करून देतो की, मी किती भाग्यवान आहे. तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस… मला कायम आनंदी ठेवणारी, आपल्या मुलांची काळजी घेणारी, प्रेम व आदराने सर्वांचं मन जिंकून घेणारी, माझी मैत्रीण…आणि सर्वकाही.”

अभिनेता पुढे म्हणतो, “जिनिलीया तू कुटुंबातील प्रत्येकासाठी खूप काही करतेस, आम्हाला सगळ्यांना कायम आनंदी ठेवतेस. जरी प्रचंड थकलेली असशील तरीही कोणाला काय हवंय, काय नकोय याकडे तुझं नेहमी लक्ष असतं. तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चिअरलीडर आहेस…जी मला कायम पाठिंबा, प्रोत्साहन देते. तुझं घरात कायम हसत-खेळत वावरणं, सर्वांवर प्रेम करणं, मित्रांबरोबर आपण एकत्र घालवलेला वेळ…एकंदर काय, तर तू माझ्या आयुष्यातील अशी एकमेव व्यक्ती आहेस, जिच्यावर मी प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहू शकतो.”

“तू मला प्रत्येक गोष्टीसाठी मार्ग दाखवला आहेत, आयुष्याच्या विविध टप्प्यात तू माझी उत्तम सहकारी आहेस…आमच्या कुटुंबाचं तू हृदय आहेस, आपली मुलंही प्रत्येक गोष्ट सर्वातआधी तुला सांगतात. आजचा हा खास दिवस तू स्वत:साठी साजरा कर. जिनिलीया आज तुझ्यामुळे मी एक चांगला माणूस, एक चांगला जोडीदार बनू शकलो आणि यासाठी तू मला कायम प्रेरणा दिलीस. तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी मी सर्वात जास्त देवाचे आभार मानतो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बायको…मी आज माझे शब्द पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही, कारण यापेक्षा तू माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम जिनिलीया” असं रितेशने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासह रितेशने जिनिलीयाबरोबरचे १० फोटो शेअर केले आहेत. यात त्यांचा जुना फोटो, शूटिंगच्या सेटवरचा फोटो, रियान व राहील या दोन्ही मुलांबरोबरच्या गोड फोटोंचा समावेश आहे.

दरम्यान, रितेशच्या या रोमँटिक पोस्टवर जिनिलीयाने कमेंट करत “खूप खूप थँक्यू…तुझ्याशिवाय माझा वाढदिवस कधीच पूर्ण होणार नाही” असं म्हटलं आहे. याशिवाय बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील रितेशच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत जिनिलीयाला शुभेच्छा दिल्या आहेत.