Genelia & Riteish Deshmukh : जिनिलीया आणि रितेश देशमुख यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. यामुळे या दोघांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली.

जिनिलीयाने लग्नानंतर सासरी देशमुखांच्या घरी आल्यावर सगळे मराठी सणवार, रितीरिवाज, परंपरा याबद्दल माहिती घेतल्याचं रितेशने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. गुढीपाडवा असो किंवा गणेशोत्सवर अभिनेत्री प्रत्येक मराठी सण मोठ्या आनंदाने साजरा करते. यामुळेच जिनिलीयाचं सोशल मीडियावर देखील नेहमीच कौतुक केलं जातं. आज वटपौर्णिमेच्या सणानिमित्त अनेक मराठी अभिनेत्रींनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत. जिनिलीयाने देखील दरवर्षीप्रमाणे परंपरा जपत वटपौर्णिमेचा सण साजरा केला आहे. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने पतीच्या दीर्घायुष्याचं वरदान लाभू शकतं अशी मान्यता आहे. यामुळेच विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या घेऊन पतीच्या आयुष्यासाठी व सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी प्रार्थना करतात. मराठी कलाविश्वातील बहुतांश नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी आज वटसावित्रीची पूजा केली.

जिनिलीया ( Genelia Deshmukh ) वटपौर्णिमेसाठी नटून थटून तयार झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेत्री लिहिते, “Dearest नवरा.. आय लव्ह यू रितेश” या स्टोरीमध्ये जिनिलीयाने रितेशला टॅग देखील केलं आहे. या व्हिडीओला अभिनेत्रीने त्यांच्या ‘वेड’ चित्रपटातील “सुख कळले…” गाणं जोडलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जिनिलीयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ती आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमात जिनिलीया महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. या सिनेमाची निर्मिती जिनिलीया व ज्योती देशपांडे करणार आहेत. हा सिनेमा १ मे २०२६ रोजी ( महाराष्ट्र दिन ) हा सिनेमा एकूण ६ भाषांमध्ये प्रदर्शित होईल.