Genelia Deshmukh : सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. नरकचतुर्दशीला पहाटे लवकर उठून सुवासिक तेल आणि उटणं लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. मनोरंजन विश्वातील बहुतांश सेलिब्रिटींनी देखील दिवाळीचा पहिला सण आपल्या कुटुंबीयांसह साजरा केला. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जिनिलीया दरवर्षी देशमुखांच्या घरच्या दिवाळी उत्सवाची खास झलक चाहत्यांबरोबर शेअर करते. सगळेच मराठी सणवार अभिनेत्री मोठ्या हौशेने साजरे करताना दिसते. आज दिवाळीचा पहिला दिवस असल्याने जिनिलीयाने तिच्या दोन्ही मुलांना तेल, उटणं लावून अभ्यंगस्नान घातलं. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जिनिलीया या व्हिडीओमध्ये रियान आणि राहीलला उटणं लावून अभ्यंगस्नान घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला ‘वेड’ चित्रपटातील “सुख कळले…” हे गाणं लावलं आहे. हा गोड व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री लिहिते, “R n R ( रियान आणि राहील ) हा हक्क कायमस्वरुपी माझा असेल”
दोन्ही मुलांना अभ्यंगस्नान घातल्यावर जिनिलीयाने यानंतर दोघांचं औक्षण केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. जिनिलीयाने शेअर केलेल्या या सुंदर व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
यापूर्वी गणेशोत्सवात सुद्धा नेटकऱ्यांनी रितेशच्या दोन्ही मुलांचं भरभरून कौतुक केलं होतं. रियान-राहीलने अनोख्या संकल्पनेवर आधारित बाप्पाची मूर्ती यंदा गणेशोत्सवात साकारली होती. आता देशमुखांच्या घरच्या दिवाळीचा व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.
रितेश-जिनिलीयाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनीही जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. मुलं झाल्यावर जिनिलीयाने काही वर्षे अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेतला होता. मात्र, आता अभिनेत्रीने पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. आता प्रेक्षकांना रितेशच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाची उत्सुकता आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. याशिवाय जिनिलीया या चित्रपटाची निर्माती आहे.