Subhash Ghai spoke About Madhur Dixit : माधुरी दीक्षित ९० च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजही तिची क्रेझ कायम आहे. माधुरीनं ‘अबोध’ चित्रपटातून पदार्पण केलेलं. परंतु, तिचं करिअर खऱ्या अर्थानं सुरू झालं ते सुभाष घई यांच्या ‘राम लखन’ चित्रपटामुळे. अशातच आता लोकप्रिय सेलिब्रिटी हेअर ड्रेसरने त्याबद्दल सांगितलं आहे.

माधुरीनं सुभाष घई यांच्या ‘राम लखन’, ‘कर्मा’, ‘खलनायक’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. १९८९ मध्ये आलेल्या ‘राम लखन’नंतरचं माधुरी प्रसिद्धीझोतात आली, असं म्हटलं, तर ते वावगं ठरणार नाही. त्यामध्ये अनिल कपूर, जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर ती झळकलेली. परंतु, माधुरीला ‘राम लखन’ हा चित्रपट कसा मिळाला हे तुम्हाला माहीत आहे का? चला, तर जाणून घेऊ…

माधुरी दीक्षितची ‘अबोध’साठी ‘अशी’ झालेली निवड

सेलिब्रिटी हेअर ड्रेसर खातून डिझाले (Khatoon Dizale) यांनी काही चित्रपटांसाठी माधुरीचं नाव दिग्दर्शकाला सुचवलेलं. मुलाखतीतून त्याबद्दलची माहिती देताना खातून म्हणाल्या, “सुभाष घई मला म्हणाले होते की, त्यांना एक नवीन मुलगी हवी आहे. त्यामुळे मी माधुरीचं नाव सुचवत सांगितलं की, तिनं एका चित्रपटात काम केलं आहे. मी तिचे ‘अबोध’च्या लूक टेस्टसाठी हेअर ड्रेसिंग केले होते. मी त्यांना असंही सांगितलेलं की, ती खूप छान काम करते”.

माधुरीबद्दल पुढे त्या म्हणाल्या, “काश्मीरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुभाषजींनी तिला बोलावलेलं. त्यावेळी ती तिच्या आई-वडिलांबरोबर आलेली. तिची तेव्हा डान्स टेस्ट घेण्यात आली. तिची निवड झाली आणि तिनं ‘राम लखन’मध्ये काम केलं. त्यानंतर तिला एका निर्मात्यानं ‘आवारा बाप’साठी विचारलं. मला आता त्यांचं नाव आठवत नाहीये; पण माधुरी त्या चित्रपटात झळकलेली. मीच त्यासाठी तिचं नाव सुचवलेलं आणि त्यांना सांगितलेलं की, ती खूप चांगली मुलगी आहे तेव्हा त्यांनी मला माधुरीबरोबर भेट घडवायला सांगितलेलं. तेव्हाही ती तिच्या आई-वडिलांबरोबर आलेली.”

माधुरी दीक्षितबद्दल काय म्हणालेले सुभाष घई?

हेअर ड्रेसर खातून यांनी पुढे सांगितलं, “काही काळानंतर सुभाष घई यांनी एका मुलाखतीत त्यांनी ज्या अभिनेत्रींचं करिअर घडवण्यात मदत केली, त्यांची नावं घेतलेली आणि त्यात माधुरीचं नाव होतं, त्यावेळी त्यांनी माझ्या नावाचाही उल्लेख केलेला की, खातूनजींनी मला माधुरीबद्दल सांगितलेलं. तेव्हा ते म्हणालेले, ती इतकी लोकप्रिय अभिनेत्री होईल, असं वाटलं नव्हतं. त्यावेळी सुभाष घई यांनी मला श्रेय दिलं याचा मला खूप आनंद झालेला.”