दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने नुकतंच त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याचं समजताच चाहते काळजी व्यक्त करत होते. आता धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे.

सोमवारी सकाळी हेमा मालिनी विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. गाडीतून उतरताच त्यांनी पापाराझींशी संवाद साधला आणि “सर्व काही ठीक आहे ना?” असं पापाराझींना विचारलं. हेमा यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट देखील दिली. धर्मेंद्र कसे वाटत आहेत? असं विचारल्यावर हेमा म्हणाल्या, “ठीक आहे.” यानंतर त्यांनी हात जोडून आभार मानले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शुक्रवारी, धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली. त्यांची प्रकृती ठीक असून ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते, अशी माहिती नंतर समोर आली.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, आता धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्याबरोबर राहत नाहीत. ते त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याबरोबर खंडाळा येथील फार्म हाऊसमध्ये राहतात. त्यांचं वय झालंय, त्यामुळे ते तिथे राहतात. तिथलं वातावरण, शुद्ध हवा त्यांच्या आरोग्यासाठी चांगली आहे, असं बॉबी देओलने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अजूनही चित्रपटांमध्ये काम करत आहेत धर्मेंद्र

धर्मेंद्र यांचं वय ८९ वर्षे आहे. त्यांनी २०२४ मध्ये तेरी बातों में ऐसा उलझा जिया सिनेमात काम केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये काम केलं होतं. या चित्रपटात तर धर्मेंद्र यांनी शबाना आझमीबरोबर किसिंग सीनही केला होता. आता लवकरच ते श्रीराम राघवन यांच्या इक्कीसमध्ये झळकणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर सिमर भाटिया बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात जयदीप अहलावत, सिकंदर खेर, विवान शाह, राहुल देव, आर्यन पुष्कर, प्रगती आनंद हे कलाकार आहेत.