Actress Hina Khan & Rocky Jaiswal Wedding : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून अभिनेत्री हिना खान घराघरांत लोकप्रिय झाली. वैयक्तिक आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून हिना कॅन्सरशी झुंज देत आहे. तिला तिसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाचं ( ब्रेस्ट कॅन्सर ) निदान झालं होतं. या कठीण काळात अभिनेत्रीला कुटुंबीयांसह तिच्या बॉयफ्रेंडने खंबीरपणे साथ दिली.
हिना खान व रॉकी जैस्वाल जवळपास ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघं लग्न केव्हा करणार याची हिनाचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर रॉकीशी गुपचूप लग्न करुन हिनाने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या दोघांचा लग्नसोहळा नोंदणी पद्धतीने पार पडला. याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
“आम्हा दोघांचं जग खूपच वेगवेगळं आहे यातून आम्ही प्रेमाचं नवीन विश्व निर्माण केलं. आमच्यातील मतभेद कमी झाले, आमची मनं जुळली आणि आता आम्ही दोघंही आयुष्यभरासाठी बंधनात अडकलो आहोत. आम्हीच एकमेकांचं घर आहोत, आम्हीच आमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जा आहोत आणि आम्हीच आमची आशा आहोत. आम्ही एकत्र मिळून सगळे अडथळे पार केले आहेत. आज आमचं प्रेम जिंकलं. आता पती आणि पत्नी म्हणून हा नवा प्रवास सुरू करताना तुम्ही आम्हाला तुमचे शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा द्या…” अशी पोस्ट शेअर करत हिनाने भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, हिना-रॉकी यांच्या प्रेमकहाणीबद्दल ( Hina Khan Lovestory ) सांगायचं झालं तर, हिनाने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये तिने अक्षराची भूमिका साकारली होती. हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी त्यावेळी या मालिकेचा प्रोड्युसर होता. दोघांची यादरम्यानच भेट झाली आणि पुढे मालिकेच्या सेटवर त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली.
संपूर्ण हिंदी टेलिव्हिजन विश्वातून सध्या हिनावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. याशिवाय अमृता खानविलकर, ऋतुजा बागवे, मेघा धाडे, क्षिती जोग या मराठी अभिनेत्रींनी हिनाच्या पोस्टवर कमेंट्स करत तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.