Homebound is India’s official entry for Oscars 2026 : २०२६ च्या अकादमी पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये भारताकडून ‘होमबाउंड’ हा हिंदी चित्रपट पाठवण्यात आला आहे. ‘होमबाउंड’ हा सिनेमा ऑस्करसाठी भारताची अधिकृत एंट्री आहे. भारतातील विविध भाषांमधील २४ चित्रपट ऑस्करसाठी शर्यतीत होते आणि ‘होमबाउंड’ची निवड करण्यात आली, असं कोलकाता येथे पत्रकार परिषदेत बोलताना निवड समितीचे अध्यक्ष एन चंद्रा म्हणाले.

“२४ चित्रपटांमधून एक निवडणं खूप कठीण होतं. कारण हे सर्व चित्रपट उत्तम होते. आम्ही परीक्षक नव्हतो, आम्ही प्रशिक्षक होतो. आम्ही अशा खेळाडूंच्या (चित्रपटांच्या) शोधात होतो ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे,” असं चंद्रा म्हणाले.

‘होमबाउंड’ मध्ये इशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट उत्तर भारतातील एका छोट्या गावातील दोन बालपणीच्या मित्रांची कथा सांगतो. हे दोघेही पोलिसाची नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असतात. ही नोकरी त्यांना आदर मिळवून देते. मुख्य म्हणजे ‘होमबाउंड’ अद्याप प्रदर्शित झालेला नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक पोस्टर शेअर करून हा चित्रपट २६ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होईल, अशी घोषणा केली आहे.

दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

‘होमबाउंड’चे दिग्दर्शक नीरज घायवान म्हणाले, “ऑस्करमध्ये भारताची अधिकृत एंट्री म्हणून होमबाउंड सिनेमाची निवड करण्यात आली, याचा मला खूप अभिमान वाटतोय. आपल्या कथा जगभरात पोहोचवणे आणि चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची बाब आहे आणि यासाठी मी अत्यंत आभारी आहे.”

करण जोहरची प्रतिक्रिया

होमबाउंडची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. “‘होमबाउंड’ चित्रपटाची अकादमी पुरस्कारांसाठी भारताकडून अधिकृत एंट्री म्हणून निवड झाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. नीरज घायवानची मेहनत जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात नक्कीच स्थान मिळवेल,” असं करण जोहर म्हणाला.

स्पर्धेतील इतर चित्रपट

२४ चित्रपटांमध्ये स्पर्धा होती. त्यात अभिषेक बच्चनचा ‘आय वाँट टु टॉक’, ‘पुष्पा २’, ‘द बंगाल फाईल्स’ ‘जुगनुमा’, ‘फुले’ यांचा समावेश होता. या यादीत चार मराठी चित्रपटही होते. त्यामध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणारा ‘दशावतार’, ‘स्थळ’, ‘साबर बोंडं’ आणि ‘आता थांबायचं नाय’ यांचा समावेश होता. सर्व २४ चित्रपटांपैकी ‘होमबाउंड’ची निवड करण्यात आली.