Shah Rukh Khan’s Mannat Bunglow : बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. यादरम्यान अभिनेता त्याच्या कुटुंबीयांसह पाली हिल येथे राहत आहे. अशातच एका समाजिक कार्यकत्याने अभिनेत्याच्या घरी अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर बीएमसीतील सदस्यांकडून अभिनेत्याच्या घराची पाहणी करण्यात आली.
शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्यात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार केली गेली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी अभिनेत्याच्या टीमशी या संदर्भात भेट घेतली. ‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने माध्यामांना सांगितले, “अनधिकृत बांधकामासंबंधित तक्रार मिळाल्यामुळे एका पथकाने जागेची तपासणी केली. वनाधिकाऱ्यांसह बीएमसीचे सदस्यांचा या तपास पथकात सहभाग होता”.
संतोष दौंडकर यांनी शाहरुख खानच्या घरी अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार केली होती. शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांनी यासंबंधित माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली आहे. त्या म्हणाल्या, “मन्नत येथे अनधिकृत बांधकाम सुरू नसून, या संदर्भात कोणत्याही तक्रारी नाहीयेत. सर्व काम मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू आहे.”
शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने ‘मन्नत’चं इंटेरियर डिझाइन केलं आहे. शाहरुख गेली बरीच वर्षं त्याच्या कुटुंबीयांसह येथे राहत आहे. त्याची मुलं लहानाची मोठी याच घरामध्ये झाली. सध्या खान कुटुंबीय वांद्रे येथील पाली हिल परिसरातील पूजा कासा या इमारतीत राहत आहेत.
दरम्यान, शाहरुख खान सध्या त्याच्या ‘किंग’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खानसुद्धा झळकणार आहे. सुहाना तिच्या वडिलांसह पहिल्यांदाच या चित्रपटातून झळकणार आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसह दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, अनिल कपूर हे कलाकारही झळकणार आहेत.