India’s Richest Actress: सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, नयनतारा अशा अभिनेत्रींचा समावेश होतो. तसेच ऐश्वर्या रायचा चाहतावर्ग मोठा आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश कमावले आहे, त्यामुळे या अभिनेत्रीची यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणना होते.

आता नुकतीच २०२५ मधील हुरुन रिच इंडिया लिस्ट जाहीर झाली आहे. अनेकांना असे वाटत असेल की यापैकी एखादी अभिनेत्री श्रीमंत कलाकारांमध्ये अग्रस्थानी आहे. पण, आता जाहीर झालेल्या हुरुन रिच लिस्टमध्ये यापैकी कोणत्याही अभिनेत्रीचे नाव नाही; तर ती अभिनेत्री कोण आहे? भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेऊयात…

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण?

२०२५ मधील हुरुन रिच इंजिया लिस्टमध्ये ही अभिनेत्री दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे तिने हृतिक रोशन, करण जोहर आणि बच्चन कुटुंबाला मागे टाकले आहे. शाहरुख खाननंतर अभिनेत्री दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे सध्या ती पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात काम करत नाही.

हुरुन रिच इंडियानुसार जुही चावला सर्वात श्रीमंत बॉलीवूड अभिनेत्री आहे. अभिनेत्रीची एकूण संपत्ती ७,७९० कोटी इतकी आहे. इतक्या संपत्तीसह ती फक्त भारतातीलच नाही, संपूर्ण जगभरातील श्रीमंत कलाकारांपैकी एक ठरली आहे.

अभिनेत्रीच्या संपत्तीमध्ये तिच्या अभिनयाचा मोठा वाटा नाही. गेल्या १३ वर्षांत जुही चावलाचा एकही चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला नाही. मात्र, जुही चावला व तिचे पती जय मेहता यांचे विविध उद्योग व्यवसायाचा या संपत्तीमध्ये मोठा वाटा आहे. रेड चिलीज ग्रुपमध्ये शाहरुख खान आणि जुही चावला व्यावसायिक भागीदार आहेत. त्याबरोबरच आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स या टीमचेदेखील शाहरुख खान, जुही चावला व तिचा पती जय मेहता हे भागीदार आहेत. जुहीचे पती जय मेहता उद्योजक असून त्यांच्याबरोबर तिने अनेक इतर कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे.

हुरुन रिच लीस्टमध्ये इतर अभिनेत्रींच्या संपत्तीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, इतर काही स्रोत आणि रिपोर्टसनुसार ऐश्वर्या रायची संपत्ती ८८० कोटी इतकी आहे.

दरम्यान, जुही चावला अभिनेत्री असण्याबरोबरच एक व्यावसायिकदेखील आहे. ८०-९० च्या दशकात एकापेक्षा एक चित्रपट करीत तिने सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. २००९ मध्ये लक बाय चान्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. मात्र, त्यानंतर या अभिनेत्रीने व्यवसायावर लक्ष केंद्रित केले.