Ameesha Patel Memories with Indira Gandhi: अमीषा पटेलला २००० मध्ये आलेल्या ‘कहो ना… प्यार है’ या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. अमीषाने नंतर ‘गदर: एक प्रेम कथा’, ‘हमराज’ आणि ‘रेस २’ सारखे चित्रपट केले. सध्या ती फारसे चित्रपट करत नसली तरी तिच्या सोशल मीडिया पोस्ट व वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

अमीषा पटेलच्या कुटुंबाबद्दल फार लोकांना माहीत नाही. अमीषा अभिनय क्षेत्रात आली असली तरी तिचे आजोबा भारतातील एक प्रतिष्ठित वकील व राजकारणी होते. कौटुंबीक पार्श्वभूमी व आजोबांमुळे बालपण दिग्गजांच्या सहवासात गेलं, असं अमीषा पटेलने सांगितलंय.

अमीषा पटेलचा जन्म भारतातील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. ती वकील आणि राजकारणी बॅरिस्टर रजनी पटेल यांची नात आहे. अमीषा पटेल ही अमित पटेल व आशा पटेल यांची मुलगी आहे. तिला अश्मित पटेल नावाचा धाकटा भाऊ आहे. रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये अमीषाने दिवंगत भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधींशी असलेल्या अनोख्या नात्याबद्दल सांगितलं.

इंदिरा गांधींनी ठरवलेली अमीषा पटेलच्या आई-वडिलांच्या लग्नाची तारीख

अमीषा पटेल म्हणाली, “माझ्या आई-वडिलांच्या लग्नाची तारीख इंदिरा गांधी यांनी ठरवली होती. त्यांच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी पत्रिका पाहिल्या नव्हत्या. माझे आजोबा, बॅरिस्टर रजनी पटेल यांनी इंदिरा गांधींना विचारलेलं, ‘इंदिरा, तुम्हाला वेळ कधी आहे?’ त्या म्हणालेल्या, रजनी, मला ४ जुलै रोजी वेळ आहे.’ अशा रितीने माझ्या आई-वडिलांच्या लग्नाची तारीख ४ जुलै ठरवण्यात आली. त्यांचं लग्न दक्षिण मुंबईतील ताजमहाल पॅलेस, कुलाबा येथे झालं होतं.”

अमीषा पटेलच्या जन्मानंतर रुग्णालयात आल्या होत्या इंदिरा गांधी

प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेल्या अमीषा पटेलला बालपणी खूप दिग्गज लोकांचा सहवास लाभला. “९ जून १९७५ रोजी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला, तेव्हा मला सर्वात आधी भेटायला आलेल्या पाहुण्या इंदिरा गांधी होत्या. मी या लोकांना पाहत मोठी झाले. देव आनंद, दिलीप कुमार, एम. एफ. हुसेन हे सर्वजण आमच्या घरी येत असत. एम. एफ. हुसेन भिंतीवर चित्र काढायचे आणि निघून जायचे. मी हे सगळं बालपणी पाहिलंय,” अशा आठवणी अमीषा पटेलने सांगितल्या.