‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना अशातच आता एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझावर त्याचे स्टेप्स ‘हाऊसफुल ५’ चित्रपटातील गाण्यात हुबेहूब कॉपी केल्याचा आरोप केला आहे.

इन्फ्लुएन्सर संदीप ब्राह्मणने असा आरोप केला आहे की, ‘हाऊसफुल ५’ च्या चित्रपट निर्मात्यांनी त्याच्या डान्स स्टेप्स त्यांच्या चित्रपटात हुबेहूब कॉपी केल्या आहेत आणि त्यांनी इन्स्टाग्राम किंवा यूट्यूबवर कुठेही त्याला क्रेडिट दिलेलं नाही. त्याने त्याच्या फॉलोअर्सला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत त्याला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे. ‘हाऊसफुल ५’चे निर्माते आणि रेमो डिसूझा यांनी अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

संदीपचे इन्स्टाग्रामवर २.५ लाख इतके फॉलोअर्स आहेत. संदीपने इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओमार्फत याबाबत सांगितलं आहे. तो म्हणाला, तुम्हा सगळ्यांना माझे सिगनेचर स्टेप्स माहिती आहेत. माझे हे स्टेप्स ‘हाऊसफुल ५’ चित्रपटातील ‘लाल परी’ गाण्यात कॉपी करण्यात आले आहेत. हे गाणं पाहिल्यानंतर माझ्या अनेक मित्रांनी मला मेसेज करत याबाबत कळवलं, म्हणून मी इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर बघितलं, पण कुठेही मला याचं श्रेय देण्यात आलेलं नाही. त्यामुळे मला कळत नाहीये हे काय घडत आहे.” संदीप पुढे म्हणाला, “मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, त्यामुळे तुम्ही जमेल तितक्या लोकांना हा व्हिडीओ शेअर करा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुण मनसुखानी दिग्दर्शित ‘हाऊसफुल ५’ चित्रपट ६ जूनला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील ‘लाल परी’ या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. रेमो डिसूझाने गाण्याची कोरिओग्राफी केली असून यो यो हनी सिंगने हे गाणं गायलं आहे. या गाण्यात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस यांसारखे इतर कलाकारही झळकले आहेत.