Kangana Ranuat’s MP bunglow : अभिनेत्री कंगना रणौत या बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. कंगना त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. समाजात घडणाऱ्या घटनांवर त्या नेहमी मत मांडत असतात. त्यामुळे बऱ्याचदा कंगना चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. कंगना या राजकारणातही कार्यरत आहेत. जवळपास एक वर्षभरापूर्वी कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या .

अशातच आता कंगना यांनी अक्षय्य तृतीयेचं औचित्य साधून केंद्र सरकारनं दिलेल्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी राहायला गेल्या आहेत. या संदर्भातील माहिती स्वत: त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली आहे. पोस्ट केलेल्या स्टोरीमध्ये त्यांनी घराची झलक दाखवली आहे.

कंगना यांनी शेअर केलेल्या व्हिडीओ व फोटोंमध्ये त्यांच्या घरात पारंपरिक पद्धतीनं गृहप्रवेश करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या घराची झलक पाहायला मिळत असून, घराला पारंपरिक पद्धतीनं सजावट केलेली पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या त्यांच्या घरातील प्रवेशद्वारामध्ये श्रीकृष्णाचा मोठा फोटो लावलेला आहे आणि संपूर्ण घराला पांढऱ्याशुभ्र फुलांनी सजवण्यात आलं आहे. यावेळी अभिनेत्रींचं कुटुंबही उपस्थित असल्याचं दिसतं. कंगनासह त्यांच्या वहिनी रितू रणौत व मुलं पाहायला मिळत आहेत.

कंगना रनौत इन्स्टाग्राम स्टोरी

कुटुंबीयांसह दिल्लीतील शासकीय निवासस्थानी प्रवेश करतानाचे फोटो पोस्ट करीत म्हटलं आहे की, १०० वर्षं जुन्या असलेल्या वास्तूला सजवणं सोपं नव्हतं. तसेच, त्यांनी त्यांचं घर सजवण्यात मदत केलेल्या इंटेरीयर डिझायनरचेही आभार मानले आहेत. गृहप्रवेश करताना कंगना पारंपरिक पद्धतीची साडी नेसल्याचं पाहायला मिळतं. यावेळी कंगना यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून, त्यावर पारंपरिक पद्धतीचे दागिने परिधान केल्याचं दिसतं.

दरम्यान, कंगना कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, तर कधी राजकीय क्षेत्रातील वक्तव्यांमुळे चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच त्यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर भाष्य करणारा होता. परंतु, चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात स्वत: कंगना मुख्य भूमिकेत होत्या. कंगनासह अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर यांसारखे दिग्गज कलाकार त्यामध्ये पाहायला मिळाले होते.