१९९० च्या दशकात अंडरवर्ल्डचे बॉलीवूडवर पूर्णपणे नियंत्रण होते. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार दाऊद इब्राहिम, अबू सालेम जे सांगतील ते करायचे. १९९० च्या उत्तरार्धात राम गोपाल वर्मा सारख्या चित्रपट निर्मात्यांनी अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. सत्या आणि कंपनीसारख्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी अंडरवर्ल्डने पैसा पुरवला होता, असं एका आयपीएस अधिकाऱ्याने म्हटलंय.
१९९८ ते २००१ या काळात मुंबई क्राइमचे संयुक्त पोलीस आयुक्त डी शिवनंदन यांनी एएनआयशी बोलताना काही गोष्टी सांगितल्या. “सत्या, कंपनी, डॅडी, शूटआउट अॅट वडाळा, शूटआउट अॅट लोखंडवाला सारखे चित्रपट गुंडांची प्रतिमा चांगली करण्यासाठी बनवले गेले होते. गुंडांनीच या चित्रपटांच्या निर्मितीसाठी पैसा दिला होता,” असा दावा शिवनंदन यांनी केला. राम गोपाल वर्मा यांच्या कंपनीमध्ये मोहनलाल यांनी केलेली भूमिका डी शिवनंदन यांच्यावर आधारित होती. १९७० च्या दशकातील ‘दीवार’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ सारख्या चित्रपटांना त्यांच्याकडूनच पैसा पुरवला जात होता, असंही शिवनंदन यांनी सांगितलं.
दाऊदच्या मुलीच्या मनोरंजनासाठी दुबईला गेलेले ८३ जण
१९९० च्या दशकात अंडरवर्ल्डने बॉलीवूड सिनेमांसाठी खूप पैसा पुरवला होता. त्यामुळे इंडस्ट्रीतील बहुतांशी गोष्टींवर त्यांचं नियंत्रण होतं. “दाऊद इब्राहिम सर्व अभिनेत्रींना दुबईला बोलावायचा आणि त्यांना बक्षिसे देऊन परत पाठवायचा,” असं शिवनंदन म्हणाले. “एकदा बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता आणि इतर ८३ संगीतकार आणि अभिनेते दाऊद इब्राहिमच्या मुलीच्या मनोरंजनासाठी कार्यक्रम करायला दुबईला गेले होते. मी त्यांना एका खास विमानाने जाताना आणि परत येताना पाहिलं होतं,” असं शिवनंदन यांनी नमूद केलं.
इंडस्ट्रीतील कलाकार त्याकाळी दाऊदला इतके घाबरून होते की ते नाही म्हणू शकत नव्हते, असं शिवनंदन यांनी स्पष्ट केलं. “कलाकारांकडे नाही म्हणण्याचा पर्याय नव्हता आणि आमच्याकडे त्यांचे संरक्षण करण्याचे कोणतेही साधन नव्हते आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई केली नव्हती, हे मी मान्य करतो,” असं ते म्हणाले. त्यांनी एक प्रसंग सांगितला, जेव्हा गोविंदाने डॉनसमोर डान्स केला होता.
मी नाचून आलोय – गोविंदाने दिलेली कबुली
“अभिनेता गोविंदाने कबूल केलं होतं. ‘आपण काय करू शकतो? मी जाऊन नाचून आलोय’ आम्ही कोणतीही कारवाई केली नव्हती,” असं शिवनंदन म्हणाले. त्याकाळी निर्मात्यांना दाऊदची खूप भीती होती. ते केव्हाही जीव घेऊ शकतात, असं त्यांना वाटायचं.
“त्याकाळी चित्रपट व्यवसायाला उद्योगाचा दर्जा नव्हता, त्यामुळे पैशांसाठी निर्मात्यांना संघर्ष करावा लागायचा. शेवटी ते ६० ते ८० टक्के व्याजदराने अंडरवर्ल्डकडून पैसे घ्यायचे. जर त्यांनी ते पैसे परत दिले नाही तर त्यांचं काही खरं नाही अशी परिस्थिती होती. पण आम्ही केलेल्या ऑपरेशन्समुळे ती स्थिती बदलली. आम्ही त्या सगळ्या गोष्टी समोर आणल्या,” असं शिवनंदन म्हणाले. त्यांच्यामते, त्यांच्या ऑपरेशनमुळेच चित्रपट व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळाला आणि कायदेशीर माध्यमांतून पैसे येऊ लागले, असं शिवनंदन यांनी स्पष्ट केलं.
