बॉलीवूडचा ‘पोस्टर बॉय’ म्हणून अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) ओळखला जातो. वयाची पन्नाशी ओलांडूनही जॉन तरुण कलाकारांपेक्षा फिट अँड फाईन आहे. जॉनने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. महेश भट्ट यांच्या ‘जिस्म’ या चित्रपटातून जॉनने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. ‘जिस्म’ या चित्रपटात अभिनेता जॉनबरोबर अभिनेत्री बिपाशा बासूही मुख्य भूमिकेत झळकली होती. यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
२००४ मध्ये आलेल्या ‘धूम’ या चित्रपटाने त्याच्या कारकिर्दीला एक वेगळी दिशा मिळवून दिली. ‘गरम मसाला’, ‘टॅक्सी नंबर ९२११’, ‘काबुल एक्स्प्रेस’, ‘सलाम-ए-इश्क’, ‘न्यूयॉर्क’, ‘शूटआउट ॲट वडाळा’, ‘मद्रास कॅफे’, ‘परमाणू’ आणि ‘बाटला हाऊस’सारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले. अशातच अलीकडेच त्याने एका मुलाखतीत एका चित्रपटानंतर अभिनेता म्हणून वडिलांनी निराशा व्यक्त केल्यानंतर योग्य चित्रपट निवडण्याची जबाबदारी आल्याचे सांगितले.
चित्रपट निवडीबद्दल जॉनने नुकताच ह्युमन्स ऑफ सिनेमाशी संवाद साधला. यावेळी त्याच्या चित्रपट निवडीसाठी एका घटना कारणीभूत असल्याचे त्याने सांगितलं. या घटनेची आठवण करून देताना तो म्हणाला, “मी माझ्या आयुष्यात काही असे चित्रपट केले आहेत, जे भयंकर चुकीचे ठरले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनी चित्रपटाचे मूल्यांकन केले आणि नंतर मग माझंही मूल्यांकन केलं गेलं.” यापुढे जॉनने सांगितलं की, वडिलांनी त्याच्या एका चित्रपटासाठी आणि कामाबद्दल निराशा व्यक्त केली होती.”

याबद्दल जॉन असं म्हणाला की, “माझ्या वडिलांनी एकदा माझा एक चित्रपट पाहिला होता. मी चित्रपटाचे नाव उघड करणार नव्हतो, पण त्यांनी तो पाहिला आणि म्हणाले की, ‘बेटा, असा चित्रपट करू नकोस, यामुळे तुझ्याविषयीची निष्ठा आणि आदर कमी होईल’, त्यांच्या या वक्तव्यामुळे मला खूप त्रास झाला होता. पण, यासाठी मला शिकण्यास मदत झाली. याचा अर्थ असा आहे का की मी नेहमीच चांगला चित्रपट निवडेन? तर नाही. पण, मी काळजी घेतली. माझी चांगल्या कथा सांगण्याची कल्पना आहे.”
२००३ पासून बॉलीवूड विश्वात सक्रिय असलेल्या जॉनने या मुलाखतीत निर्माता होण्यामागील कल्पनादेखील सांगितली. याबद्दल त्याने असं म्हटलं की, “निर्माता म्हणून मी असे काहीतरी निवडेन, जे पूर्णपणे समजण्यासारखे असेल. परंतु, एक अभिनेता म्हणून मी पूर्णपणे चुकीचे ठरलो आहे. कारण मी जे चित्रपट करत होतो आणि जे चित्रपट पाहत होतो, यामुळे मी त्या चित्रपटांवर खूश नव्हतो, म्हणून मला गोष्टी बदलायच्या होत्या.”