Johny Lever Used Do Drink Till 4 am On Mumbai’s Choupatty Beach : कलाकारांना शूटिंगनिमित्त दिवसभर काम करावं लागतं. अनेकदा त्यांचं दिवसाचं वेळापत्रक ठरलेलं असतं व त्यानुसार त्यांना रात्र आणि दिवस काम करावं लागतं. यामुळे अनेकदा त्यांना थकवा येतो, काहीवेळा गोष्टी असहाय होतात. असंच अभिनेते जॉनी लिव्हर यांनी याबाबत सांगितलं आहे. सततच्या कामामुळे ते खूप थकायचे व त्यामुळे ते दारू प्यायचे असंही म्हटलं आहे.
जॉनी लिव्हर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं आहे. आजवर अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवणारे जॉनी लिव्हर यांनी त्यांची लेक जिमी लिव्हरसह एकत्र मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी ते एकेकाळी दारूच्या आहारी गेले होते, याबद्दल सांगितलं आहे.
जॉनी लिव्हर यांनी मुलाखतीमध्ये त्यांच्या व्यग्र वेळापत्रकाबद्दल सांगितलं आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम झाल्याच त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, “मी खूप थकायचो. मी दिवसा चित्रपटांचं चित्रीकरण करायचो आणि रात्री शो करायचो. त्यावेळी मी खूप दारू पित होतो, त्यामुळे मी शुद्धीत नसायचो.”
जॉनी लिव्हर पहाटे ४ वाजेपर्यंत चौपाटीवर बसून दारू प्यायचे
जॉनी लिव्हर पुढ म्हणाले, “मी कितीही दारू प्यायलेलो असलो तरी वेळेत माझं काम करायचो. पण, रात्रीच्या कार्यक्रमानंतर माझ्यामध्ये अजिबात ताकद नसायची. पुढे अभिनेते त्यांच्या चाहत्यांना आवाहन करत म्हणाले, “मी सगळ्यांना विनंती करतो की दारू पिताना स्वत:वर नियंत्रण ठेवा. दारू आहारी जाऊ नका. मी अतिप्रमाणात दारू पित होतो, पण त्याने काही फायदा होत नाही. मी चौपाटीवर बसून पहाटे ४ वाजेपर्यंत दारू प्यायचो. अनेकदा पोलिस यायचे, पण ते मला ओळखायचे आणि म्हणायचे की अरे जॉनी भाई.. आणि मला तिथेच बसू द्यायचे.”
याच मुलाखतीमध्ये जॉनी लिव्हर पुढे म्हणाले, “यश माणसाला उद्ध्वस्त करू शकतं. एक वेळ अशी होती, जेव्हा प्रत्येक चित्रपटात मी असायचो. मी परदेशातही कार्यक्रम करायचो. प्रवास करायचो. मी त्यातच स्वत:ला वाहून घेतलं होतं. पण, मी निर्णय घेतला आणि दारू सोडली. आता हा निर्णय घेऊन २४ वर्षे झाली आहेत, मी इतकी वर्षे दारूला हातसुद्धा लावला नाहीये. मी अभिमानाने सांगू शकतो की, मी कितीही दारू पित असायचो तरी कामाच्याबाबत मी शिस्तप्रिय होतो”.